गैरप्रकार थांबण्यासाठी पर्याय हवा

सकाळ कार्यालय - एकमेकांवरील टीका टाळून संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’साठी एकत्र आले होते. या वेळी (डावीकडून) लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, किशोर सानप.
सकाळ कार्यालय - एकमेकांवरील टीका टाळून संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’साठी एकत्र आले होते. या वेळी (डावीकडून) लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, किशोर सानप.

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळे दोष आहेत. या दोषांमुळेच साहित्य संस्थांकडून एकगठ्ठा मते मिळणे, उमेदवारांकडून जात-धर्माच्या नावाने प्रचार होणे, राजकीय पक्ष-‘संघ’टनांच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकणे, आयोजक-साहित्य संस्थांना प्रलोभन दाखवणे... अशा गैरप्रकारांचे आरोप होत आहेत. ते थांबण्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडण्याचा योग्य पर्याय पुढे आला पाहिजे, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनीच एकत्रितपणे व्यक्त केली.

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे यांनी ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून शुक्रवारी वाचकांशी संवाद साधला. यानिमित्ताने तीनही उमेदवार प्रथमच एका व्यासपीठावर आले. तिघेही एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांच्यात विविध विषयांवर मनमोकळी चर्चा रंगली आणि त्यांनी एकमेकांना मैत्रीपूर्ण लढतीसाठी शुभेच्छाही दिल्या.
ग्रामीण भागात संमेलन व्हावे

लक्ष्मीकांत देशमुख : गेल्या तीस वर्षांपासून साहित्याची सेवा करत आहे. या कालावधीत तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजातील परखड वास्तव मांडून थांबलो नाही. रामायणाचा आदर्शवाद आणि महाभारताचा परखड वास्तववाद समोर ठेवून लेखन करत आलो. जे योग्य नाही ते कसे बदलायला हवे, हेही सांगत आलो आहे. लेखनाबरोबरच विविध संस्थांची उभारणीही केली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलावी, अशी अपेक्षा वारंवार व्यक्त केली जाते; पण ठोस पर्याय पुढे येत नाही. तो एकत्रित प्रयत्नांतूनच येईल. अध्यक्षाला बोलायला पुरेसा वेळ मिळावा. मराठी वाचकांना जोडून घेण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच बृहन्‌ महाराष्ट्रात संमेलन होणे गरजेचे आहे.

गंभीर विचारांचा उत्सव व्हावे
डॉ. किशोर सानप : कालसापेक्ष परीप्रेक्षातून गेल्या चाळीस वर्षांपासून लेखन करत आहे. तुकोबांचे शब्दधन वाटणाऱ्या आणि ज्ञानेश्‍वरांचे विश्‍व कल्याणाचे स्वप्न पाहणाऱ्या परंपरेचा मी पाईक आहे. खरंतर सर्वच मराठी सारस्वत ज्ञानोबा-तुकोबांच्या परंपरेचे पाईकच आहेत, असे माझे मत आहे. संतांचा जीवनमार्ग दु:ख मुक्तीचा मार्ग ठरू शकतो. समाजाला याचीच गरज आहे. हे मला संमेलनाच्या व्यासपीठावरून सांगायचे आहे. म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे; पण मला सध्याची निवडणूक प्रक्रिया योग्य वाटत नाही. निवडणुकीपेक्षा संमेलनाध्यक्षाची निवड व्हायला हवी. ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकांना सन्मानाने हे पद द्यायला हवे. संमेलन हे गंभीर विचारांचा उत्सव असले पाहिजे. 

जागरूकतेने मतदान करावे
रवींद्र शोभणे - कथा, कादंबरी, समीक्षा, ललित, वैचारिक अशा विविध वाङ्‌मय प्रांतात गेल्या ४० वर्षांपासून लेखन करत आलो आहे. ग्रामीण जीवनापासून शहरी प्रश्‍नांपर्यंतचा आवाका माझ्या साहित्यात आहे. अनेक संमेलनांचे आयोजनही केले आहे. त्यात लेखक-कार्यकर्ता म्हणून काम केले. याच भूमिकेतून निवडणुकीसाठी उभा आहे. निवडणुकीत वेगवेगळे गैरप्रकार सुरू असले तरी मतदारांनी जागरूकतेने मतदान करावे. याआधीच्या वेगवेगळ्या संमेलनात मी रसिक, वाचक, वक्ता म्हणून सहभागी झालो आहे. संमेलन हे एकमेकांना जवळ आणणारे माध्यम आहे.

देशमुख म्हणाले
    संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लोकशाही जपली पाहिजे
    जात-धर्म आणि प्रादेशिक मुद्यांच्या आधारे निवडणूक होऊ नये
    संमेलन राजकारण्यांनी ‘हायजॅक’ करू नये; संमेलनाध्यक्ष मुख्य असावा.
    संमेलनाध्यक्ष ‘ॲक्‍टिव्ह’ असला पाहिजे. त्याने भाषणातून नवा विचार दिला पाहिजे
    अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचे आजचे वातावरण गढूळ झाले आहे

सानप म्हणाले
    प्रचारासाठी आत्तापर्यंत अकरा हजार किलोमीटर प्रवास केला आहे
    संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ, प्रतिभावंतांची सन्मानाने निवड व्हायला हवी
    समाजातील प्रश्‍नांचे चिंतन मांडण्यासाठी संमेलनाध्यक्षपद महत्त्वाचे आहे
    प्रतिभावंतांच्या लेखनकृतीचे, भूमिकांचे पुनर्मूल्यांकन करणार आहे
    सध्याचे वातावरण लेखकांसाठी फार पोषक नाही. हा चिंतेचा विषय आहे

शोभणे म्हणाले
    मतदारांनी विवेक बाळगून संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करावे
    अरुणा ढेरे यांच्यासारख्या महिलांनी अध्यक्षपदासाठी पुढे यावे
    संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ असावा; पण तो वयाने की कर्तृत्वाने?
    संमेलनात वाद व्हावेत; पण ते उण्या-दुण्या स्वरूपात नक्कीच नसावेत
 लेखक अन्यायग्रस्तांच्या बाजूनेच असतो. म्हणूनच ‘पुरस्कार वापसी’ झाली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com