पारदर्शी प्रतीक्षा यादीचा पुण्यात विकास 

योगिराज प्रभुणे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - दान केलेले अवयव नेमके कोणत्या रुग्णाला आणि का मिळणार, याची अद्ययावत माहिती देणारी देशातील पहिली पारदर्शी यंत्रणा पुण्यात विकसित करण्यात आली आहे. संगणकीकरणाच्या आधारावर तयार केलेल्या या यंत्रणेमुळे गरजू रुग्णाला अवयव मिळण्याची व्यवस्था यातून निर्माण झाली आहे. 

पुणे - दान केलेले अवयव नेमके कोणत्या रुग्णाला आणि का मिळणार, याची अद्ययावत माहिती देणारी देशातील पहिली पारदर्शी यंत्रणा पुण्यात विकसित करण्यात आली आहे. संगणकीकरणाच्या आधारावर तयार केलेल्या या यंत्रणेमुळे गरजू रुग्णाला अवयव मिळण्याची व्यवस्था यातून निर्माण झाली आहे. 

मूत्रपिंड, यकृत, हृदय अशा वेगवेगळ्या अवयवांची प्रतीक्षा यादी असते. हे अवयव मिळावे, यासाठी गरजू रुग्ण यात आपले नाव नोंदवतो. आतापर्यंत ही प्रतीक्षा यादी पारंपरिक पद्धतीने हाताळली जात होती. मात्र आता त्यासाठी स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित केली आहे. अवयवदानाची प्रतीक्षा यादी हा संवेदनशील विषय होऊ पाहात आहे. त्यामुळे पारदर्शी प्रतीक्षा यादी अद्ययावत करत राहाणे, ही काळाची गरज आहे, अशी भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

याबाबत माहिती देताना पुणे झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीचे (झेडटीसीसी) सचिव डॉ. अभय हुपरीकर म्हणाले, ""अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करणे, मिळालेला अवयव वेळेत, योग्य आणि गरजू रुग्णांपर्यंत पोचविणे आणि अवयवांची प्रतीक्षा यादी अद्ययावत करणे या प्रमुख जबाबदाऱ्या "झेडटीसीसी'वर आहेत. यात पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.'' 

असा झाला नवीन व्यवस्थेचा उदय 
प्रत्येक अवयवासाठी पुणे "झेडटीसीसी'ने स्वतंत्र उपसमिती स्थापन केली आहे. त्यातून कामकाजात सुसूत्रता आली. दान केलेले मूत्रपिंड नेमके कोणत्या रुग्णाला द्यायचे यासाठी "पॉइंट सिस्टिम'आहे. रुग्णाचे वय, किती महिन्यांपासून डायलिसिसवर आहे, या आणि अशा काही निकषांवर रुग्णाचा "पॉइंट' निश्‍चित होत असे. त्यामुळे मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीमध्ये त्याने कधी नोंदणी केली, हे त्या वेळी महत्त्वाचे मानले जात नव्हते. ही व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथील यंत्रणेचा अभ्यास केला. त्यातील दोष दूर करून अवयवदानाची पारदर्शी यंत्रणा उभारण्यात आली, असेही डॉ. हुपरीकर यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातून सर्वाधिक अवयवदान 
शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील संवेदनशील नागरिक अवयवदानाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून अवयवदानाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तसेच सोलापूर, नाशिक, जळगाव अशा भागातून फक्त अवयवदान याच उद्देशाने रुग्णाला पुण्यात आणल्याच्या काही घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्याचेही डॉ. हुपरीकर यांनी सांगितले. 

मूत्रपिंडदानात महिला आघाडीवर 
जिवंतपणी मूत्रपिंड दान करण्यात महिलांची संख्या मोठी आहे, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पती, मुलगा यांच्या मूत्रपिंडाचे कार्य थांबल्यानंतर त्यांना हा अवयव दान करण्यासाठी महिला पुढे आल्याचे दिसते. मात्र महिलांच्या मूत्रपिंडात दोष निर्माण झाल्यास त्यांच्यासाठी पुरुष पुढे येत नसल्याचेही ठळकपणे दिसत आहे. त्यामुळे महिलांना मूत्रपिंडात 0.5 पॉइटस्‌ जास्त देण्याचा निर्णय पुणे "झेडटीसीसी'ने घेतला आहे. 

- जिवंतपणी मूत्रपिंडदान करणाऱ्यांमध्ये 80 टक्के महिला 
- मूत्रपिंड स्वीकारणाऱ्यांमध्ये 80 टक्के पुरुष 

- ग्रामीण भागातील अवयवदान - 40 टक्के 
- शहरी भागातील अवयवदान - 18 टक्के 

असे झाले अवयवदान 
- अवयवदान केलेल्या "ब्रेन डेड' रुग्णांची संख्या - 43 
- मूत्रपिंडदान - 64 
- यकृत - 40 
- मूत्रपिंड आणि स्वादूपिंड - 1 
- हृदय - 8 
- फुफ्फुस 1 
(स्रोत - झेडटीसीसी, पुणे. 1 जानेवारी 2017 पासूनची आकडेवारी) 

Web Title: pune news organ donation