भाजपच्या पाठिंब्यामुळे गोरक्षकांचा उन्माद - पी. चिदंबरम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे -  "आज जिकडे तिकडे एखाद्याला एकटे पकडून जमावाने मिळून मारून टाकण्याचे (मॉब लिंचिंग) प्रकार घडत आहेत. एखाद्याला मारून टाकण्याचा हा "अधिकार' जमावाला कुणी बहाल केला? हा खुनशी आत्मविश्वास कुणी दिला? आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, हा आत्मविश्वास गोरक्षकांच्या जमावाला मिळाल्यामुळेच हा उन्माद वाढत चालला आहे. यामागे भाजपचेच सरकार आहे,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी रविवारी (ता. 23) भाजपवर घणाघात केला. 

पुणे -  "आज जिकडे तिकडे एखाद्याला एकटे पकडून जमावाने मिळून मारून टाकण्याचे (मॉब लिंचिंग) प्रकार घडत आहेत. एखाद्याला मारून टाकण्याचा हा "अधिकार' जमावाला कुणी बहाल केला? हा खुनशी आत्मविश्वास कुणी दिला? आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, हा आत्मविश्वास गोरक्षकांच्या जमावाला मिळाल्यामुळेच हा उन्माद वाढत चालला आहे. यामागे भाजपचेच सरकार आहे,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी रविवारी (ता. 23) भाजपवर घणाघात केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात चिदंबरम बोलत होते. या वेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना सडेतोड आणि मनमोकळेपणाने उत्तरे दिली. काश्‍मीरमधील परिस्थितीबद्दल ते म्हणाले, ""काश्‍मीरमध्ये भाजप-पीडीपी यांचे सरकार आल्यापासून परिस्थिती वाईटहून वाईट आणि गंभीर झाली आहे. काश्‍मीर खोऱ्याला जणू वाळीत टाकण्यात आले आहे. सरकार त्यावर लष्करी धाकातून उत्तर शोधू पाहत आहे; ही बाब अतिशय गंभीर आहे. देशासमोर काश्‍मीरची सुरक्षा, नक्षलवाद, माओवाद ही आव्हाने असून "मॉब लिंचिंग' हे याच मालिकेतील नवे आव्हान आहे.'' 

""सीमेवर रोज दोन-तीन जवान हुतात्मा होत आहेत. हे का होत आहे? त्यांच्या हौतात्म्याचे आपल्याला गांभीर्य आहे की नाही? सरकारच्या प्रयत्नांनी सीमेवर शांतता आली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावीच लागतील. ईशान्य भारतात आपला प्रवेश करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून भाजप त्या भागाला अधिक कमकुवत करत आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

देशभरात लागू करण्यात आलेल्या "जीएसटी'च्या मुद्यावर ते म्हणाले, ""आज जीएसटीचा उदोउदो करणाऱ्या भाजपने एकेकाळी आम्ही प्रस्तावित केलेल्या जीएसटीच्या विधेयकाला विरोध केला होता, हे विसरू नये. मुळात हा जीएसटी नाही. हा अजूनही "मल्टिरेट टॅक्‍स' आहे. बिस्किटे वेगळ्या दराने आणि चॉकलेट वेगळ्या दराने, मग किटकॅट कुठल्या दराने देणार? पुरेशी तयारी न करताच हा कर लागू करण्यात आला आहे. दोन महिने प्रायोगिक तत्त्वावर जीएसटी राबवून बघा, असे आम्ही सुचवले होते; पण त्यांनी कर थेट लागू केला,'' अशी टीका त्यांनी केली. 

हा तर "टॅक्‍स टेररिझम'! 
"जीएसटी'च्या माध्यमातून सरकार "टॅक्‍स टेररिझम' आणत आहे. एकीकडे आयुर्वेदावर 18 टक्के कर आणि दुसरीकडे तुम्ही त्याचा जगभर प्रचार करत आहात, सरकारने जीएसटीबद्दलचा विरोध, निषेधाची दखल घेतली पाहिजे, असे चिदंबरम यांनी ठणकावले. नोटाबंदीनंतर अद्याप रिझर्व्ह बॅंक नोटांची मोजणी झाली नसल्याचे सांगते. सरकारच्या या उत्तराची खिल्ली उडवत ते म्हणाले, ""नोटाबंदीनंतर नोटा मोजायला तिरुपतीहून जरी यंत्रे आणली असती तरी पैसे मोजून झाले असते. आपला विकासदर सात टक्के आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल? नक्की कुठल्या अर्थशास्त्राच्या आधारावर मोदी सरकार आपला विकासदर मोजू पाहत आहे.'' 

Web Title: pune news P. Chidambaram