जीएसटी नव्हे; हा तर टॅक्‍स टेररिझम: पी चिदंबरम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

गोष्टी अधिकाधिक वाईट होत गेल्या आहेत. आपला विकासदर 7 टक्के आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल? नक्की कुठल्या अर्थशास्त्राच्या आधारावर मोदी सरकार आपला विकासदर मोजू पाहत आहे ?

पुणे - माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज (रविवार) जीएसटी, जम्मु काश्‍मीर, गोरक्षा, दहशतवाद अशा विविध मुद्यांवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. सरकारने पुरेशी तयारी न करताच जीएसटी आणल्याचा आरोप करत चिदंबरम यांनी देशात या सरकारने "टॅक्‍स टेररिझम' आणल्याची टीका केली.

चिदंबरम म्हणाले -

 • काश्मीर सुरक्षा, नक्षलवाद आणि माओवाद हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानं आहेत.  'मॉब लिंचिंग' हे याच मालिकेतील नवं आव्हान आहे !
 • काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी यांचं सरकार आल्यापासून परिस्थिती वाईटहुन वाईट आणि गंभीर झाली आहे. काश्मीर खोऱ्याला जणू वाळीत टाकण्यात आलं आहे. सरकार त्यावर सतत लष्करी धाकातून उत्तर शोधू पाहत आहे. हे गंभीर आहे.
 • आज रोज दोन-तीन जवान हुतात्मा होत आहेत. हे का होत आहे ? त्यांच्या हौतात्म्याचं आपल्याला काही गांभीर्य आहे की नाही? सरकारच्या 'प्रयत्नांनी' काय फरक पडला आहे ? सीमेवर शांतता आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील !
 • ईशान्य भारतात भाजपच्या धोरणांमुळे अनेक सरकारं कमकुवत होत चालली आहेत. ईशान्य भारतात आपला प्रवेश करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून भाजप त्या भागाला अधिक कमकुवत करत आहे...
 • जमावाला एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार आज कुणी बहाल केला? हा खुनशी आत्मविश्वास या जमावाला दिला कुणी ? आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, हा आत्मविश्वास या गोरक्षकांच्या जमावाला मिळाल्यामुळे हा उन्माद वाढला आहे. या विश्वासामागे अर्थातच भाजप आहे...
 • आज जीएसटीचा उदोउदो करणाऱ्या भाजपने एकेकाळी आम्ही प्रस्तावित केलेल्या जीएसटी विधेयकाला विरोध केला होता, हे विसरू नका. बिस्किटं वेगळ्या रेट ने आणि चॉकलेट वेगळ्या, मग किटकॅट कुठल्या रेट ने देणार ?
 • हा जीएसटी नाहीच ! हा अजूनही आहे मल्टि रेट टॅक्स !
 • पुरेशी तयारी न करताच हा कर लागू करण्यात आला आहे. आम्ही सुचवलं होतं की दोन महिने प्रायोगिक तत्वावर जीएसटी राबवून बघा. पण त्यांनी थेट लागू केला. हे सरकार 'टॅक्स टेररिझम' आणत आहे.
 • आयुर्वेदावर 18 टक्के कर ?... आणि दुसरीकडे तुम्ही त्याचा जगभर प्रचार करत आहात. सरकारने जीएसटी बद्दलचा विरोध, निषेध यांची दखल घेतलीच पाहिजे. 
 • गोष्टी अधिकाधिक वाईट होत गेल्या आहेत. आपला विकासदर 7 टक्के आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल? नक्की कुठल्या अर्थशास्त्राच्या आधारावर मोदी सरकार आपला विकासदर मोजू पाहत आहे ?
 •  नोटांबंदी नंतर नोटा मोजायला तिरुपती हून जरी मशिन्स आणली असती तरी मोजून झाले असते परत आलेले पैसे...
 • 'इंदू सरकार'ला विरोध हे काही जणांनी केला आहे.  हा विरोध काँग्रेसचा अधिकृत विरोध नाही. इंदु सरकार हा प्रश्न सेन्सॉर बोर्डाचा आहे.

 

Web Title: Pune News: P Chidambaram criticizes central government