पार्किंगच्या नावाखाली लूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - महापालिकेने रस्त्यांवर उभारलेल्या वाहनतळांवरच वाहनचालकांची लूट होत आहे. जंगली महाराज रस्ता आणि कल्याणीनगर येथील ‘पे ॲण्ड पार्क’ बंद असूनही तेथे पार्किंगच्या नावाखाली काही जण पैसे उकळत असल्याचे तेथील रहिवाशांसह वाहनचालकांनी सांगितले. विशेष म्हणजे, बहुतांशी राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच वसुली करीत असल्याचा संशय आहे. बेकायदा पार्किंगचे पैसे घेतल्याच्या तक्रारी येऊनही पालिका प्रशासनाने संबंधितांना धडा शिकविलेला नाही. 

पुणे - महापालिकेने रस्त्यांवर उभारलेल्या वाहनतळांवरच वाहनचालकांची लूट होत आहे. जंगली महाराज रस्ता आणि कल्याणीनगर येथील ‘पे ॲण्ड पार्क’ बंद असूनही तेथे पार्किंगच्या नावाखाली काही जण पैसे उकळत असल्याचे तेथील रहिवाशांसह वाहनचालकांनी सांगितले. विशेष म्हणजे, बहुतांशी राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच वसुली करीत असल्याचा संशय आहे. बेकायदा पार्किंगचे पैसे घेतल्याच्या तक्रारी येऊनही पालिका प्रशासनाने संबंधितांना धडा शिकविलेला नाही. 

प्रमुख पाच रस्त्यांलगत आणि बाजारपेठांच्या परिसरात २२ ठिकाणी वाहनतळ उभारले असून, ती ठेकेदारांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली आहेत. त्यासाठी प्रत्येक तासासाठी दर निश्‍चित केला आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सोहराब हॉल, येरवडा लाल महाल चौक ते अण्णासाहेब पटवर्धन चौक, कल्याणीनगर, विधानभवन परिसरातील रस्त्यावर चारचाकींसाठी ‘पे ॲण्ड पार्क’ योजना आहे. रस्त्यांच्या कामांमुळे जंगली महाराज रस्ता व कल्याणीनगर येथील पार्किंगचा ठेका रद्द केला होता. त्यामुळे वाहनचालकांकडून पैसे घेण्यास मनाई करूनही काही जण वसुली करीत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पालिकेने लावलेले मोफत पार्किंगचे फलक गायब झाल्याने पार्किंगच्या नावाखाली वसुली होत आहे.

सुविधेपेक्षा मनस्तापच जास्त
महापालिकेच्या वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार पावती देणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेच्या नियमांकडे डोळेझाक करीत ठेकेदार मंडळी आपल्याच पद्धतीने वाहनतळांचा कारभार चालवीत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. विशेषत: कामगार उद्धट भाषा वापरत वाटेल तेवढ्या पैशांची मागणी करीत असल्याचे वाहनचालक सांगतात. पैसे मोजूनही वाहने उभी करण्याबरोबरच ती काढण्यासाठी कामगार मदतीला येत नसल्याचे चित्र काही वाहनतळांवर दिसून आले. त्यामुळे वाहनतळांवर वाहनचालकांना सुविधेपेक्षा मनस्तापच जास्त सहन करावा लागत असल्याचे दिसते.

महापालिकेचे वाहनतळ ठराविक कालावधीसाठी ठेकेदारांना भाडेतत्त्वावर दिले असून, त्यासाठी नियमावली आहे. तिचे पालन करण्याचा करार ठेकेदारांबरोबर केला आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा पाठविण्यात येतात. त्यांच्यावर कारवाईही केली जाते. पालिकेने निश्‍चित केलेल्या दरानुसारच वाहनचालकांकडून पैसे घेतले पाहिजेत.
- श्रीनिवास बोनाला, अतिरिक्त नगर अभियंता

पार्किंगसाठी पैसे घ्या; पण...! 
रस्त्यावरील पार्किंगसाठी पैसे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत आहेच; पण त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे का? खासगी वाहने कमी करत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर पुणेकरांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होईल, हे स्पष्टपणे सांगावे लागेल. 
विशेष ब्लॉग वाचण्यासाठी क्‍लिक करा www.esakal.com/blog

पे अँड पार्किंग जर तुम्ही चालू करीत असाल, तर आमच्या वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिका घेणार का? पुण्यातील पेठांमध्ये आधीच पार्किंगचा प्रश्‍न आहे; त्यात असे निर्णय होत असेल, तर येणारा काळ अवघड वाटतोय. जर असेच पैसे घ्यायचे असतील, तर आमचे कर कमी करा आणि सार्वजनिक वाहतूक आधी सुधारा; मग हा निर्णय घ्या. 
- विशाल दाते, नागरिक

महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केलेल्या नव्या पार्किंग धोरणाविषयी वाचकांनी ‘ई-सकाळ’वर अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी काही प्रतिक्रिया देत आहोत...
विशाल 
आधी बस नीट ठेवा. पाच किमीच्या रस्त्यात दोन बस बंद पडलेल्या असतात. एक काम तरी पूर्ण करा! रस्ते, बस, मेट्रो सगळेच अर्धवट आहे. 

गणेश काकडे 
‘टाउन प्लॅनिंग’च्या नावाखाली जे गब्बर झाले आहेत, त्यांनी केलेल्या घाणीची भरपाई घ्या आधी ! यांच्या खादाड वृत्तीमुळेच रस्तेही ‘होपलेस’ झाले आहेत. 

केशव केकाणे
‘पार्किंग पॉलिसी’मुळे लोक सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील; पण त्याची स्थिती चांगली नाही. सगळेच फुकट मिळावे, ही अपेक्षा आपण सोडण्याची गरज आहे.

सविस्तर प्रतिक्रियांसाठी क्लिक करा  www.esakal.com

Web Title: pune news parking loot pay and park