योगी अरविंदांना पर्वतीवर अाध्यात्मिक अनुभूती

योगी अरविंदांना पर्वतीवर अाध्यात्मिक अनुभूती

पुणे - व्यक्तीचा अंतरात्मा हा पुरुषोत्तमाच्या प्रतीक्षेत असावा. कारण, व्यक्तीचे अंतःकरण, चित्त आणि अंतरात्मा हा परमेश्‍वरस्वरूपच आहे. या तत्त्वानुसार योगी अरविंद घोष यांना ‘अनंताचा साक्षात्कार’ पुण्यातल्या पर्वती टेकडीवरील विष्णू मंदिरात झाला. त्या अनुभूतीतून उत्स्फूर्तपणे सुचलेल्या सुनीत अर्थात काव्यातून, ‘मज दिसे पृथ्वीचे शीर्ष झळकते उन्हात सुंदर’ असे वर्णनही त्यांनी केले आहे. स्वामींच्या अध्यात्माच्या प्रवासाचा प्रारंभ येथून झाल्याने या स्थानास विशेष महत्त्व आहे.

पर्वतीला दिलेल्या भेटीत योगी अरविंद यांनी ‘द हिल टॉप टेम्पल’ हे काव्य लिहिले. ते मूळ इंग्रजी भाषेतील काव्य व त्याचे मराठी रूपांतर असे दोन फलक मंदिरात पाहायला मिळतात. योगी अरविंदांचे अनुयायी आणि देवदेवेश्‍वर संस्थान पर्वती व कोथरूड यांच्या सहयोगातून हे फलक तेथे बसविण्यात आले आहेत. याप्रसंगी संस्थानचे विश्‍वस्त उदयसिंह पेशवा, रमेश भागवत, श्री अरविंद सेंटरच्या अध्यक्ष नीलिमा पाठक-डाके, डॉ. विश्‍वास डाके, बंडोपंत पानसे उपस्थित होते.  

जानेवारी १९०८ मध्ये योगी अरविंद यांनी पर्वतीला भेट दिली होती. अनंत तत्त्वाचा अनुभव विष्णू मंदिरात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. असाच अनुभव त्यांना काश्‍मीरमध्ये शंकराचार्यांच्या टेकडीवर आला होता. पुणे भेटीत त्यांनी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, प्रो. राममूर्ती, सेनापती बापट यांची भेट घेतली होती. तसेच, हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेलाही भेट दिल्याचा उल्लेख महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या आत्मचरित्रात आहे. पर्वतीला भेट दिल्यानंतर त्यांनी वाई येथील त्यांचे गुरू विष्णू भास्कर लेले गुरुजींचीही भेट घेतली होती.  

१५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन योगी अरविंदांचा जन्म दिनदेखील आहे. काळाच्या ओघात भारत जगाला मार्गदर्शन करू शकेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली असल्याचे त्यांचे अनुयायी सांगतात.

अरविंदांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने तत्कालीन निवृत्त जिल्हा न्यायाधीश ना. स. पाठक यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुण्यात श्री अरविंद मंडळाची स्थापना केली. धनकवडी येथील श्री अरविंद सेंटरद्वारे दर आठवड्याच्या सोमवारी उपासना होते. 

अतिमानस महायोगी अरविंदांचा चरणस्पर्श झाला त्याच वेळी त्यांना आध्यात्मिक अनुभूती होऊन अनंताची जाणीव झाली. लेले गुरुजींची भेट झाल्यावर त्यांना मनाची निस्तरंग अवस्था प्राप्त झाली. त्यांचे महाराष्ट्राशी असलेले हे नाते सर्वसामान्यांना समजावे या उद्देशाने तेथे रचलेल्या काव्याचे इंग्रजी आणि मराठीत फलक बसविले आहेत.
- नीलिमा पाठक-डाके, अध्यक्ष, श्री अरविंद सेंटर  

योगी अरविंदांनी पर्वतीला दिलेल्या भेटीची आठवण राहावी या उद्देशानेच तेथे त्यांचे काव्यफलक बसविले आहेत.
- रमेश भागवत, विश्‍वस्त, देवदेवेश्‍वर संस्थान, पर्वती व कोथरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com