नागरिकांची कामे गावांमध्येच होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमधून महापालिका प्रशासन आपला कारभार हाकणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीला क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी राहणार आहेत. ही गावे क्षेत्रीय कार्यालयांना जोडण्याचे नियोजन सुरू असून, प्रत्येक गावासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची कामे गावांमध्येच होणार आहेत. 

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमधून महापालिका प्रशासन आपला कारभार हाकणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीला क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी राहणार आहेत. ही गावे क्षेत्रीय कार्यालयांना जोडण्याचे नियोजन सुरू असून, प्रत्येक गावासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची कामे गावांमध्येच होणार आहेत. 

दुसरीकडे गावांमधील पायाभूत सेवा-सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या अनुषंगाने गावांमधील लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये सेवा-सुविधांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. 

हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत घेतल्याने त्या-त्या ग्रामपंचायतींकडील नोंदवह्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे गावांमधील रहिवाशांना महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये यावे लागणार आहे.

परिणामी, रहिवाशांची गैरसोय होणार असल्याने गावांमध्येच प्रशासकीय कामकाज व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ही गावे लगतच्या क्षेत्रीय कार्यालयांना जोडण्यात येणार आहे; तसेच दैनंदिन कामकाजासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने शाळा, आरोग्य, साफसफाई, विद्युत आणि बांधकाम खात्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान सुविधा उपलब्ध होणार असून, त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. शिवाय गावांमध्ये साफसफाईची कामे करणे अपेक्षित असल्याने त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडील कर्मचारी पुरविणार आहेत. या दोन्ही खात्यांची कामे आठ दिवसांत सुरू होतील, असेही सांगण्यात आले. बांधकामांची माहिती जाणून घेण्यासाठी बांधकाम खात्याने आपली यंत्रणा राबविण्यास सुरवात केली आहे. 

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘गावांमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राथमिक पाहणी केली आहे. आरोग्य, साफसफाई आणि इतर काही कामे करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.’’ 

नव्या गावांमधील रहिवाशांची कामे गावाच्या पातळीवरच व्हावीत, यासाठी गावांमध्ये कर्मचारी नेमण्याची सूचना केली आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची यंत्रणा उभारणार आहे. तेथील कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. त्यात महत्त्वाच्या खात्यांची दैनंदिन कामे नियमित होतील. आवश्‍यक तेवढे कर्मचारी पुरविण्यात येतील.
- मुक्ता टिळक, महापौर

Web Title: pune news people work in village