पाच वसाहतींचा पुनर्विकास होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पुणे - महापालिकेच्या पाच वसाहतींचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. या पाचही वसाहतींच्या विकसकांचे येत्या आठवड्यात महापालिकेशी करार होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ३०० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे या सदनिकांत वास्तव्य आहे.

आंबिल ओढ्याजवळील साने गुरुजी वसाहत, राजेंद्रनगरमधील मनपा वसाहत, वाकडेवाडी महापालिका वसाहत, पांडवनगर वसाहत आणि घोरपडे पेठेतील आठ व नऊ क्रमांकाची इमारत, या वसाहती सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यांचा ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर (बीओटी) पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर एक वर्षांनी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली; परंतु सदनिकांच्या आकारावरून वाद निर्माण झाला. विकसकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे गेल्या सात वर्षांपासून पुनर्विकासाचे काम रखडले होते.

या पार्श्‍वभूमीवर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी चाळ विभाग, बांधकाम खाते, भूमी जिंदगी आणि विधी विभागाची नुकतीच बैठक घेतली. यात सदनिकाधारकांना सुमारे ३०० चौरस फुटांचे घर आणि ७० फुटांचा टेरेस द्यायचा निर्णय झाला. न्यायालयीन दावे विकसकांनी मागे घेतले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील आठवड्यात विकसकांबरोबर महापालिका करार करणार आहे. त्यानंतर वसाहतींमधील नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅंप बांधून इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याची माहिती लडकत यांनी दिली. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक धीरज घाटे यांनीही या बाबत प्रश्‍न उपस्थित केला होता.

Web Title: pune news pmc