महापालिकेचे "डायबेटिक केअर युनिट' 

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - मधुमेह म्हटलं की, उपचार, औषधे, विविध प्रकारच्या तपासण्या आणि सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा मोठा खर्च आपसूकच येतो. आधीच मधुमेह आणि त्यात सतत वाढणाऱ्या खर्चामुळे मधुमेही रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अधिकच तणाव निर्माण होतो. मधुमेहींचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना एका छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका "डायबेटिक केअर युनिट' तयार करणार आहे. त्यामध्ये मधुमेही रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व तपासण्या, नामवंत तज्ज्ञांकडून उपचार व मानसिक आधार देण्याचाही महापालिका प्रयत्न करणार आहे. 

निवृत्तीनंतरचा आजार अशी ओळख असलेला मधुमेह आता तरुण वयातच विळखा घालू लागल्याची सद्यःस्थिती आहे. मधुमेह शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करतो. त्यासाठीच्या तपासण्या किंवा उपचार घेण्यासाठी रुग्णांना अनेक तज्ज्ञ डॉक्‍टर, रुग्णालयांचे उंबरे झिजवावे लागतात. रुग्णांची अडचण लक्षात घेऊन महापालिकेने "डायबेटिक केअर युनिट'साठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

हाडांच्या आजारावर उपचार करण्यासाठी महापालिकेतर्फे कमला नेहरू रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच धर्तीवर महापालिका "डायबेटिक केअर युनिट' सुरू करणार आहे. या विषयी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ""येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात "डायबेटिक केअर युनिट' सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये मधुमेहासंबंधीच्या सर्व तपासण्या, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आदींचा समावेश असणार आहे. शासकीय दरात ही सुविधा मधुमेही रुग्णांना मिळेल.'' 

मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुहास एरंडे म्हणाले, ""नोकरी-व्यवसायातील तीव्र स्पर्धा, वाढते तणाव, शीतपेये, फास्टफुडचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणांमुळे शहरी नागरिकांमध्ये मधुमेह वाढत आहे. शहरांमध्ये प्रत्येक बारावा ते पंधरावा माणूस मधुमेही असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना योग्य आहार, तपासण्या, उपचारांची गरज असते.'' 

चाळिशीच्या आधीच विकार 
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राच्या शहरी भागात 7.38 टक्के तर ग्रामीण भागात 5.1 टक्के इतके मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पुण्यासारख्या शहरात 6 टक्के नागरिकांना मधुमेहाने ग्रासले आहे. 2000 ते 2004 पर्यंत 54 ते 56 या वयापर्यंत मधुमेह मर्यादित होता. मात्र 2007 ते 1014 या काळात मधुमेह 44-45 वयाच्याही खाली आल्याचा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला आहेत. 

मागील काही वर्षांपासून मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह म्हणजे केवळ साखर तपासणे इथपर्यंतच मर्यादित नाही, तर त्यामुळे हृदय, डोळे, मेंदू, मूत्रपिंड यांसारख्या विविध अवयवांवर परिणाम होतो. त्यासाठी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासणी करावी लागते. काही तपासण्या महागड्या असून त्या सर्वसामान्यांना परवडत नाहीत. याबरोबरच या तपासण्या करण्यासाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. म्हणूनच मधुमेहासंबंधीचे सर्व उपचार, तपासण्या एकाच ठिकाणी करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी मधुमेहतज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. 
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर 

Web Title: pune news pmc Diabetes Care Unit