शिपाईच सुरक्षारक्षक? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

काही खात्यांमध्ये जादा कामगार आहेत. त्यात, काही ठिकाणी शिपाई आणि सुरक्षारक्षकही नेमले आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणीच सुरक्षारक्षक आणि शिपाई नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी खातेनिहाय माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या फेरनियुक्‍त्या केल्या जातील.
-प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिपायांकडे सुरक्षारक्षकांच्या कामांची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासन करीत आहे. विशेषत: शिक्षण मंडळाकडील जादा शिपायांना ही कामे देण्याचे नियोजन आहे. काही खात्यांमध्ये जादा कामगार असतानाही केवळ काही कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. या कामगारांच्या पगारासाठी जादा निधी उपलब्ध करून देण्याच्या हालचालीही करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्यत: अतिक्रमण, आकाशचिन्ह, आरोग्य, साफसफाई, सुरक्षा आदी विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगार नेमण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक सुरक्षारक्षक आणि शिपायांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे नऊशे सुरक्षारक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करीत, सुरक्षारक्षकांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. या पाश्‍वभूमीवर वेगवेगळ्या खात्यांकडील कामगार, विशेषत: शिपाई आणि सुरक्षारक्षकांची कामे, त्याच्या वेळा याचे सुसूत्रीकरण करून, त्यांच्या फेरनियुक्‍त्या करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

ठराविक कंत्राटदारांच्या  कामगारांना अभय ? 
महापालिकेच्या काही विभागांत शिपाई आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, या ठिकाणी दोघांची गरज नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आणखी सुरक्षारक्षक आणि शिपायांना कामावरून कमी करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासन करीत असतानाच, काही ठराविक कंत्राटदारांकडील कामगारांना अन्य विभागात नेमण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षण मंडळात साडेचारशे शिपाई ! 
शिक्षण मंडळाकडे (शिक्षण  विभाग) सुमारे साडेचारशे  शिपाई आहेत. मात्र, एवढ्या शिपायांची गरज नसल्याचे  दिसून आले आहे. त्यामुळे या शिपायांकडे आता 
सुरक्षारक्षकांच्या कामाची  जबाबदारी देण्यात येणार  आहे.

Web Title: pune news pmc Peon