पासिंग नसतानाही 77 बस रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - "पीएमपी'च्या दोन ठेकेदारांकडील 77 बसचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात "पासिंग' झालेले नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले आहे. त्यातील तीन बसचा हडपसर, सुखसागरनगर येथे अपघातही झाला आहे. 

पुणे - "पीएमपी'च्या दोन ठेकेदारांकडील 77 बसचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात "पासिंग' झालेले नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले आहे. त्यातील तीन बसचा हडपसर, सुखसागरनगर येथे अपघातही झाला आहे. 

पीएमपीमध्ये पाच ठेकेदारांच्या सुमारे 650 बस भाडेतत्त्वावर आहेत. त्यातील ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेडच्या 31, तर महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या 36 बसचे पासिंग झालेले नाही, असे उत्तर माहिती अधिकारात श्रीकांत कर्वे यांना पीएमपीकडून मिळाले आहे. या बसच्या पासिंगची मुदत कधीपर्यंत आहे, याची माहिती संबंधितांकडे असते. तरीही मुदत उलटून गेल्यावरही त्यांचे पासिंग झालेले नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही या माहितीला दुजोरा दिला आहे. 

दरम्यान, 77 बस पासिंगशिवाय मार्गांवर धावत असल्याचे दिसून आल्यावर कर्वे यांनी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना एक निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, ""पासिंगची मुदत उलटून गेल्यावरही या बस मार्गांवर धावत आहेत, ही बाब गंभीर आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. कंत्राटदाराने पीएमपीला भाडेतत्त्वावर बस देताना त्यांचे मुदतीमधील पासिंग असणे गरजेचे आहे. ते नसल्यास पीएमपीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे; अन्यथा काही गंभीर बाब उद्‌भवल्यास त्याची जबाबदारी पीएमपीची असेल. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास न्यायालयात फौजदारी खटला दाखल करणार आहे.'' 

पीएमपी कारवाई करणार 
याबाबत पीएमपीचे मुख्य अभियंता शिवाजी जाधव म्हणाले, ""पासिंगची मुदत संपलेल्या बस मार्गांवर सोडलेल्या नाहीत; मात्र पासिंग अजून न केलेल्या संबंधित ठेकेदारांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच बस मुदतीत उपलब्ध करून न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.''

Web Title: pune news pmp bus RTO