पीएमपीची बससेवा सुधारण्यास प्राधान्य - गुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिक आदी समाज घटकांसाठी पीएमपी बससेवा सुधारण्यासाठी प्राधान्य असेल,’’ असे पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सोमवारी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निलंबन आदींबाबत प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - ‘‘महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिक आदी समाज घटकांसाठी पीएमपी बससेवा सुधारण्यासाठी प्राधान्य असेल,’’ असे पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सोमवारी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निलंबन आदींबाबत प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार गुंडे यांनी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वीकारला. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारमध्ये गुंडे यांची विविध पदांवर सुमारे २५ वर्षे नियुक्ती झाली आहे. परिवहन विभागात पहिल्यांदाच त्या काम पाहणार आहेत. पदभार स्वीकारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘प्रवाशांमध्ये महिला, युवती, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना सुरक्षित आणि वेळेत प्रवासाची हमी देणे गरजेचे आहे. महिलांसाठी राज्य सरकारने तेजस्विनी बस मंजूर केल्या आहेत. त्यांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बस पीएमपीच्या ताफ्यात लवकर उपलब्ध होतील, याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे.’’ शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी जागरूकता निर्माण करावी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गुंडे यांनी पदभार स्वीकारल्यावर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘निलंबन, बदल्यांबाबत पूर्वी काही निर्णय झाले आहेत. त्यात बदल करण्याची मागणी होत आहे. परंतु प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेऊन कंपनीच्या नियमांप्रमाणे निर्णय घेतले जातील.’’ पीएमपीची माहिती घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संस्थेचा अभ्यास करण्यासाठी काही कालावधी लागेल. त्यानंतर याबाबत प्राधान्यक्रम निश्‍चित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संवादाने पीएमपीची प्रगती 
पीएमपीचे या पूर्वीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयांचा लगेचच फेरविचार होणार नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन पीएमपीच्या हिताची अंमलबजावणी केली जाईल, असेही गुंडे यांनी स्पष्ट केले. सुमारे दहा हजार कर्मचारी, दहा लाखांपेक्षा जास्त रोजचे प्रवासी असलेल्या या संस्थेत काम करणे आव्हान आहे. परंतु विविध समाज घटकांशी संवाद साधून पीएमपीची प्रगती करण्याचा निर्धार गुंडे यांनी व्यक्त केला. 

Web Title: pune news pmp bus service development nayna gunde