पीएमपीच्या चाळीस बसचा रोज ‘ठिय्या’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे - वर्दळीच्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असताना पीएमपी प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, परंतु मार्गांवरील बसच्या फेऱ्यांवरही परिणाम होत आहे. बस बंद पडल्यावर  दुरुस्तीची व्हॅन सुमारे ४५ मिनिटे ते एक तासाने पोचत आहे. 

पुणे - वर्दळीच्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असताना पीएमपी प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, परंतु मार्गांवरील बसच्या फेऱ्यांवरही परिणाम होत आहे. बस बंद पडल्यावर  दुरुस्तीची व्हॅन सुमारे ४५ मिनिटे ते एक तासाने पोचत आहे. 

मार्गावर धावणाऱ्या पीएमपीच्या बस इंजिनमधील नादुरुस्ती किंवा टायर पंक्‍चर होणे आदी विविध कारणांमुळे रस्त्यावरच बंद पडतात. अनेकदा बस गर्दीच्या रस्त्यावर बंद पडते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता आदी अनेक रस्त्यांवर नेहमीच हे चित्र दिसते. बस बंद पडल्यावर प्रवाशांची व्यवस्था त्याच मार्गावरील दुसऱ्या बसमध्ये केली जाते. परंतु अनेकदा बंद पडलेल्या बसजवळच प्रवासी आणि कंडक्‍टर थांबलेले दिसतात. त्यानंतर तेथून जाणारी बस थांबवून प्रवाशांची व्यवस्था केली जाते. बंद पडलेल्या बसच्या दुरुस्तीसाठी नजीकच्या डेपोतून ‘मोबाईल व्हॅन’ बोलविली जाते. सध्या सरासरी ४५ मिनिटे ते १ तासाने ही व्हॅन घटनास्थळी पोचते. त्यानंतर मोबाईल व्हॅनच्या मदतीने बस बाजूला घेऊन दुरुस्त केली जाते. जर काम मोठे असल्यास बस कार्यशाळेत नेली जाते. या प्रक्रियेत किमान एक ते दोन तास जातात. ठेकेदारांच्या ५५० बस पीएमपीमध्ये आहेत. त्यांच्याही मोबाईल व्हॅन घटनास्थळावर उशिरा पोचतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. परिणामी, त्या मार्गावरील बसच्या फेऱ्यांची संख्या घटते आणि प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. 

बंद पडलेल्या बसचा ‘कॉल’ पोचल्यावर मोबाईल व्हॅन किमान १५ मिनिटांत घटनास्थळी पोचली, तर बस लवकर दुरुस्त होऊन मार्गावर धावू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

आगार, ठेकेदारांना सूचना देणार 
या बाबत पीएमपीचे मुख्य अभियंता शिवाजी जाधव म्हणाले, ‘‘बस बंद पडल्यावर नजीकच्या डेपोमध्ये कळविले जाते. तेथून अर्ध्या ते एक तासात दुरुस्तीची व्हॅन पोचते. बस रस्त्यावरून बाजूला घेऊन लगेचच दुरुस्त केली जाते. व्हॅन घटनास्थळी लवकर पोचण्यासाठी आगारांना पुन्हा सूचना देण्यात येतील.’’ ठेकेदारांच्या मोबाईल व्हॅनलाही या संदर्भात सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. 

१२ मोबाईल व्हॅन घेण्याचा प्रस्ताव 
शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये दररोज विविध कारणांमुळे ३०-४० बस बंद पडतात. पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसचा त्यात समावेश आहे. १३ पैकी ९ आगारांतच सध्या दुरुस्तीसाठी मोबाईल व्हॅन आहेत. त्यांच्या माध्यमातूनच बसची दुरुस्ती केली जाते. परंतु बस रस्त्यावरून तातडीने बाजूला घेण्यासाठी पीएमपीकडे क्रेन नाहीत. त्यामुळे आगामी काळात ३ क्रेन आणि दुरुस्तीसाठी १२ मोबाईल व्हॅन घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर त्या बाबतची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: pune news pmp bus stop