रिंगरोडला अडथळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर वडगाव, वारजेसह तीन ठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती द्यावी, असे पीएमआरडीएने महापालिकेस कळविले आहे. महापालिकेकडून या परवानग्या अधिकृतरीत्या देण्यात आल्यास रिंगरोडच्या मार्गात पुन्हा बदल करावा लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांच्या हरकती-सूचना मागवून या रिंगरोडची मार्गिका अंतिम करण्यात आली आहे. १२९ किलोमीटर लांबीच्या या रिंगरोडचा काही भाग महापालिकेच्या हद्दीतून वारजे, वडगाव आणि आणखी एका गावातून जातो. त्या भागात महापालिकेने रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावर काही ठिकाणी परवानगी दिली आहे.

रिंगरोडच्या संदर्भात चार दिवसांपूर्वी मुंबई येथे नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला पीएमआरडीए आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या आणि महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोडमध्ये बांधकाम परवानगी देण्यात आल्याचे महापालिकेने निदर्शनास आणून दिले. त्या वेळी या परवानग्या कधी दिल्या आहेत. त्या अधिकृतपणे दिल्या आहेत का, याची तपासणी महापालिकेने करावी. तसेच ती माहिती पीएमआरडीएला उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. जर या परवानग्या अधिकृतपणे दिल्या असतील, तर रिंगरोडच्या मार्गात काही प्रमाणात पुन्हा बदल करावा लागणार आहे. जर या मार्गावर बेकायदेशीर बांधकामे झाली असतील, तर त्यावर कारवाई करावी, असेही या बैठकीत ठरल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news PMRDA ringroad pmc