लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - वाहनचालकाला गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली. आणखी एका पोलिस शिपायाचा शोध सुरू आहे.

पुणे - वाहनचालकाला गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली. आणखी एका पोलिस शिपायाचा शोध सुरू आहे.

कुंदनसिंग छानवाल (रा. औरंगाबाद) यांनी याप्रकरणी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश मारुती सोनवणे (वय 30, रा. हडपसर), अनिल हनुमंत रासकर यांच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनवणे याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले होते. छानवाल हे 6 जून रोजी लक्ष्मी रस्त्यावरून रात्री अडीचच्या सुमारास जात होते. तेव्हा नाकाबंदी सुरू होती, पोलिस कर्मचारी सोनवणे आणि रासकर यांनी छानवाल यांची मोटार रविवार पेठ पोलिस चौकीजवळ अडविली. तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडील मोबाईल, वाहन चालविण्याचा परवाना, मोटारीची चावी काढून घेतली. "रेड लाइट' एरियात आल्यामुळे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची त्यांना धमकी दिली. गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तीस हजार रुपयांची लाच छानवाल यांच्याकडे मागितली.

भीतीपोटी छानवाल हे 25 हजार रुपये देण्यास तयार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख काढून घेतले, त्यानंतर एटीएममधून 15 हजार रुपये काढण्यास लावले. पैसे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मोटारीची चावी, मोबाईल, वाहन चालविण्याचा परवाना परत दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोनवणेला अटक करून न्यायालयात हजर करून त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपीचा साथीदार रासकर हा घटनेच्या दिवसापासून पसार झाला आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे, 25 हजार रुपयांचे काय केले, एटीएम केंद्राचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासायचे आहे, त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने सोनवणेला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: pune news police news maharashtra news marathi news