‘पैशाच्या झाडा’ला भविष्याची चिंता!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पुणे - ‘पैशाचे झाड’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबाला भविष्याच्या चिंतारोगाने ग्रासले आहे. सध्या या फळाला मिळत असलेला कमी भाव, प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम  उत्पादनाचा अभाव यामुळे ही चिंता ठाकली आहे. दर्जेदार उत्पादन निर्मिती आणि प्रक्रिया उद्याेगाला चालना दिली, तरच यातून मार्ग निघून उत्पादकांचे नुकसान टळणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.

पुणे - ‘पैशाचे झाड’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबाला भविष्याच्या चिंतारोगाने ग्रासले आहे. सध्या या फळाला मिळत असलेला कमी भाव, प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम  उत्पादनाचा अभाव यामुळे ही चिंता ठाकली आहे. दर्जेदार उत्पादन निर्मिती आणि प्रक्रिया उद्याेगाला चालना दिली, तरच यातून मार्ग निघून उत्पादकांचे नुकसान टळणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.

राज्यात पुणे, सातारा, नगर, सोलापूर, सांगली, नाशिक, जळगाव, जालना, बीड या जिल्ह्यांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. पुणे जिल्ह्यातही डाळिंबाच्या लागवडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा अधिक आवक होत असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. तीन वर्षांपूर्वी डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. तो आता १० ते ९० रुपयांपर्यंत मिळत आहे. मार्केट यार्ड येथील फळ बाजारात सरासरी प्रतिदिन ४० टन आवक होत आहे. पुण्याच्या बाजारातून उत्तर भारतातील दिल्ली, गोरखपूर, अहमदाबाद, गोवा, मुंबई येथे माल पाठविला जातो, असे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. 

‘‘डाळिंबाची आवक पूर्वी मर्यादित होती. ती आता वाढली आहे. डाळिंबावर पडणाऱ्या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी औषधांची निर्मितीही झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढत आहे. बाजारात आवक वाढली, तर भाव कमी होतात. हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे.’’

संशोधनास प्राधान्य द्यावे 
नोटाबंदीनंतर फळांचे बाजार कोसळले होते, असे व्यापारी तानाजी चौधरी यांनी नमूद केले. ‘‘लागवड क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होत असल्याचा परिणाम भावावर होत आहे. आपल्याकडील हंगाम हा सप्टेंबर, ऑक्‍टोबरपर्यंत चालतो.

त्यानंतर गुजरात, राजस्थान येथील डाळिंबाचे उत्पादन सुरू होते. त्या काळात परराज्यातील मागणी कमी हाते. डाळिंबाचे उत्पादन जास्त होत आहे आणि देशातील बाजारपेठेची मर्यादा आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना निर्यात हाच एकमेव पर्याय असून, शेतकऱ्यांनी त्या दर्जाचा माल उत्पादित केला पाहिजे. डाळिंबावर प्रक्रिया उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने संशोधनास प्राधान्य दिले पाहिजे. याचा ‘पल्प’ किंवा इतर उत्पादन तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आत्तापासूनच उपाय करणे आवश्‍यक आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news pomegranate future