दिवे घाटात दरडी कोसळण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्याने रस्ता धोकादायक

उरुळी देवाची - दिवेघाटातून होणारी वाहतूक रस्त्याच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त असल्याने घाटात सतत वाहनांची गर्दी असते. काही ठिकाणच्या धोकादायक वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्याने रस्ता धोकादायक

उरुळी देवाची - दिवेघाटातून होणारी वाहतूक रस्त्याच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त असल्याने घाटात सतत वाहनांची गर्दी असते. काही ठिकाणच्या धोकादायक वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

घाटात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून, त्यांना संरक्षक जाळ्या बसविलेल्या नसल्याने हा रस्ता जास्तच धोकादायक झाला आहे. 
कोसळलेल्या दरडीचा राडारोडा तसाच रस्त्याच्या कडेला व नाल्यात पडून आहे. दरडी कोसळण्याची शक्‍यता असणाऱ्या धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. घाटाच्या दरीकडील बाजूस काही ठिकाणी लोखंडी रोलिंग केले आहे पण अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी वाहन दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी घाटातून जाताना लाखो वारकरी पालखीसोबत चालत असतात. पावसाळ्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही वारंवार घाडतात. दरडीचे लहान मोठे दगड रस्त्यावर असल्याने दुचाकीस्वारांना जास्त धोका संभवतो. 

दरडी कोसळून पडलेला राडारोडा रस्त्यालगतच्या नाल्यामध्ये पडून राहिल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहून रस्ता खराब होतो. रस्त्याचे रखडलेले काम, तुटलेले संरक्षक कठडे, कोसळलेल्या दरडीचा राडारोडा, खड्डे यांची पालखी आगमनापूर्वी दुरुस्ती करून संभाव्य कोसळू शकणाऱ्या दरडींना संरक्षक सुरक्षा जाळ्या बसवाव्यात, घाटाची रुंदी वाढवावी व धोक्‍याची सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

Web Title: pune news The possibility of collapsing in the dive ghat