पत्रे जाणार उडत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे - परदेशात ड्रोनद्वारे कुरिअर सेवा सुरू झाल्याने टपाल खात्यानेही आता ड्रोनवरून थेट टपाल कार्यालयात पत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रांचे वाटप करण्याबाबत टपाल खाते गांभीर्याने विचार करत असून, येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीचे कामकाज सुरू होणार आहे.

पुणे - परदेशात ड्रोनद्वारे कुरिअर सेवा सुरू झाल्याने टपाल खात्यानेही आता ड्रोनवरून थेट टपाल कार्यालयात पत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रांचे वाटप करण्याबाबत टपाल खाते गांभीर्याने विचार करत असून, येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीचे कामकाज सुरू होणार आहे.

टपाल खात्याचा पुणे विभाग प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन आणि सेगवे या सुविधा सुरू करणार असून, त्याचे प्रात्यक्षिक २० जानेवारी रोजी भरणाऱ्या ‘महापेक्‍स’ प्रदर्शनादरम्यान होणार आहे. सुरवातीला अर्धा किलो वजनाची पत्रे ड्रोनद्वारे पाठविण्यात येतील. पोस्टमनला वेळेत टपाल वितरित करता यावे, यासाठी सुरवातीला भाडेतत्त्वावर ‘सेगवे’ बॅटरी डिव्हाइस मशिन घेण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडामंच येथे भरणाऱ्या महापेक्‍स प्रदर्शनातून स्वारगेट येथील टपाल कार्यालयापर्यंत ड्रोनवरून पत्रे पाठविण्यात येणार आहेत, तर स्वारगेट टपाल कार्यालयापासून सिटी पोस्टापर्यंत ‘सेगवे’द्वारे टपाल पाठविण्यात येईल. या प्रयोगाच्या यशस्वीतेनुसार ड्रोन व सेगवे वापरण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे. दरम्यान, गणेश कला क्रीडामंच येथे २० ते २२ जानेवारी दरम्यान महापेक्‍स हे टपाल तिकिटांच्या संग्रहाचे प्रदर्शन भरणार आहे. सहा वर्षांनंतर पुण्याला हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र व गोवा येथील तिकीट संग्राहकांच्या ४०० फ्रेम प्रदर्शनात असतील. महापेक्‍स स्मरणिकाही प्रकाशित होईल. पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहील.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या शक्‍यता निर्माण होतात. त्यातूनच ड्रोन व सेगवेचा प्रयोग करण्याचा टपाल खात्याचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा-सुविधा पुरविताना त्या अधिक सोप्या पद्धतीने देण्याचा हा प्रयत्न आहे. दस्तनोंदणीसंबंधी टपाल खात्याने एजन्सी घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येईल. 
- गणेश सावळेश्‍वरकर,  पोस्ट मास्तर जनरल, पुणे विभाग

विभाजनाचा प्रस्ताव
पुणे विभागाचे विभाजन करून बारामती विभाग सुरू करण्याचे, तसेच सातारा आणि कराड हेही विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंबंधी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झाला आहे. पुण्यातील सिटी पोस्टातही पेमेंट बॅंकिंग सुरू करण्याविषयी पायाभूत सेवासुविधांचे झाले आहे. मात्र केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत. मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी सांगितले.

Web Title: pune news post office