'सरल', "शगुन'बाबत योग्य पावले उचलू - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - 'शिक्षकांसाठी राज्याच्या "सरल' आणि केंद्र सरकारच्या "शगुन' वेबपोर्टलवर एकच माहिती भरण्यात वेळ वाया जाऊ नये, यासाठी आवश्‍यक पावले उचलण्यात येतील, त्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील,'' असे आश्‍वासन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिले. त्यामुळे शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील शिक्षकांना "सरल' संगणकीय पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी "शगुन' नावाचे वेबपोर्टल विकसित केले आहे. शिक्षकांना या पोर्टलवर शाळांमधील विद्यार्थी, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, प्रयोग याची माहिती भरावी लागणार आहे. दोन्ही पोर्टलच्या कामकाजाचा उद्देश एकच आहे. त्यामुळे एकच काम शिक्षकांना दोनदा करावे लागणार आहे. त्यामुळे वैतागलेल्या शिक्षकांनी केंद्राच्या "शगुन'ला विरोध करण्यास सुरवात केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर जावडेकर यांना विचारले असता, ते म्हणाले, "सरल' हे राज्याचे तर "शगुन' केंद्र सरकारचे वेबपोर्टल आहे. या दोन्ही वेबपोर्टलचा उद्देश वेगळा आहे. मात्र, शिक्षकांना एकच माहिती दोन्ही ठिकाणी भरावी लागत असल्यास आणि त्यात वेळ वाया जाणार असल्यास, त्याबाबत योग्य निर्णय घेऊ. संगणकीय प्रणालीद्वारे एकच माहिती दोन्ही पोर्टलवर घेण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊ. शिक्षकांचा त्रास कमी कसा होईल, यासाठी प्रयत्न करू.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वीस विद्यापीठे जागतिक दर्जाची करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या जागतिक विद्यापीठांच्या योजनेत देशातील आठशे विद्यापीठांना सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यासाठी विद्यापीठांना पुढील दहा वर्षांचा विद्यापीठ विकासाचा अहवाल तयार करून पाठवायचा आहे. जागतिक विद्यापीठांची निवड करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे. या योजनेत निवड झालेल्या विद्यापीठांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहणार आहे. विविध प्रकारच्या मान्यता घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडे जावे लागणार नाही, असेही जावडेकर म्हणाले.

Web Title: pune news prakash javadekwar talking on shagun web portal