'परिवर्तनासाठी समाजशिक्षण आवश्‍यक'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कर्तृत्वाचा ठसा
डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘बालपण, शिक्षण व संस्कारांद्वारे माणूस मोठा होतो. मनुष्याचे कर्तृत्व बहरत जाते. बाबासाहेब आणि भाऊराव यांनी निरनिराळ्या जातीत जन्मून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ब्राह्मणांनी कुंठित ठेवलेली ज्ञानगंगा भाऊरावांनी दऱ्याखोऱ्यांपर्यंत पोचवली; तर आयुष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखून बाबासाहेबांनी समाजाकडून शिक्षणाचा आग्रह धरला.’’ 

पुणे - ‘‘शंकराचार्यांनी एक हजार वर्षांपूर्वी कलियुगाची सुरवात झाल्याचे म्हटले आणि धर्मावर अनेक निर्बंध घातले गेले. त्याचे परिणाम पुढे झाले. तेव्हापासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ऱ्हासाला सुरवात झाली. बाबर, ब्रिटिश आल्यानंतर संस्कृतीसहित सामाजिक ऱ्हास झाला. पूर्वी जातीयवाद आणि कर्मठपणा प्रचंड होता. सद्यःस्थितीत त्याची तीव्रता कमी झाली असली तरीही, अद्याप तो संपलेला नाही. सामाजिक परिवर्तनाकरिता समाजशिक्षण आवश्‍यक आहे,’’ असे मत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, उपाध्यक्ष डॉ. ए. व्ही. संगमनेरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते. संजीवनी मुजुमदारलिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील-एक तौलनिक अभ्यास’, आणि ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र’ या पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. बाबासाहेबांचे गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर यांचे नातू कॅप्टन रमेशचंद्र आंबेडकर आणि नात भाग्यश्री निमकर यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकास भेट देऊन बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेतले तसेच संजीवनी मुजुमदार यांच्या कार्याचे कौतुकही केले.  

पवार म्हणाले, ‘‘मला महामानव करू नका, असे बाबासाहेब म्हणत असत. कारण त्यांचे पाय जमिनीवर होते; परंतु त्यांचा महामानव म्हणून वापर केला जातो. बाबासाहेब हे अत्यंत भव्य व्यक्तिमत्त्व होते. अभ्यासक, वाचक, नागरिक म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडतात आणि आपण नतमस्तक होतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्कर्षाची संधी मिळाली पाहिजे, तेव्हाच समाज पुढे जातो. हाच प्रयत्न भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर केला.’’

‘‘देशप्रेम, समाजप्रेम कमी होत असल्याची शंका वाटते. इंग्रजी भाषेमुळे आपल्या भाषा नामशेष होतात की काय, अशीही भीती वाटते. इतिहासाबद्दल या देशाला अनास्था आहे, कारण शेक्‍सपिअर मुलांना माहीत आहे, पण कालिदास माहिती नाही. हा तरुणपिढीचा दोष नाही, तर यास समाजच दोषी आहे. डॉ. आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांची व्यक्तिमत्त्वे प्रेरणा देणारी आहेत. संजीवनी मुजुमदार यांनी लिहिलेली दोन्ही पुस्तके विचार करायला लावणारी असून, प्रत्येकाने ती पुस्तके जरूर वाचावीत,’’ असेही पवार म्हणाले. 

संजीवनी मुजुमदार म्हणाल्या, ‘‘कर्मवीरांच्या सान्निध्यात मी लहानाची मोठी झाले. माई आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या वस्तू सिंबायोसिसला दिल्यापासून त्यांच्याशी स्नेह जुळला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून बाबासाहेबांचे विचार समजत गेले.’’

Web Title: pune news Prataprao Pawar Social education needed for change