युवकांनी राष्ट्रनिर्माणाचे काम हाती घ्यावे - पंतप्रधान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जगातील युवकांसमोर आदर्श निर्माण करण्याची क्षमता फक्त भारतीय युवकांमध्येच आहे. त्यादृष्टीने युवकांनी राष्ट्रनिर्माणाचे काम हाती घेण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पुणे - भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जगातील युवकांसमोर आदर्श निर्माण करण्याची क्षमता फक्त भारतीय युवकांमध्येच आहे. त्यादृष्टीने युवकांनी राष्ट्रनिर्माणाचे काम हाती घेण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय युवा पुरस्कार 2015-16' या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दिल्लीत गौतम बुद्ध विद्यापीठामध्ये करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री राजवर्धन राठोड, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेंद्र शर्मा, नेहरू युवा केंद्राचे संचालक दिलावर सिंह, सदस्य राणी द्विवेदी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री आदित्यनाथ व राठोड यांच्या हस्ते पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांना "राष्ट्रीय युवा पुरस्कार 2015-16' प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये व मानचिन्ह असे स्वरूप आहे. या वेळी मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

मोदी म्हणाले, 'माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांचे स्वप्न आणि राष्ट्रनिर्माणाचे हे काम या देशातील युवकच करू शकतात. स्वामी विवेकानंद यांचे जीवन देशातील युवकांसाठी "रोल मॉडेल' आहे.''

विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, प्रकल्प व वैविध्यपूर्ण प्रयोग राबविण्याचे काम संस्थेने केले आहे. त्यानिमित्त संस्थेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला. लंडनच्या कॉमनवेल्थ यूथ कौन्सिलच्या सल्लागारपदी झालेल्या निवडीद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवरही संस्थेची दखल घेण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या ऑनलाइन निवड प्रक्रियेद्वारे नामवंत संस्थांमधून या संस्थेची निवड झाली. याविषयी डॉ. भोई म्हणाले, 'या सन्मानामुळे केंद्र सरकारच्या युवक कल्याण व राष्ट्रविकास या विषयांवरील योजना, प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी भोई प्रतिष्ठानला प्राप्त झाली. हा सन्मान संस्थेसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.''

Web Title: pune news prime minister talking