'नवी समीकरणे जमल्यास राजकीय इतिहास बदलेल '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

शिवसेनेला भाजपबरोबर जावे लागेल 
कार्यक्रमानंतर चव्हाण यांची पत्रकारांनी भेट घेऊन, शिवसेनेच्या युती तोडण्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले,""शिवसेनेने आगामी निवडणुका वेगळे होऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन; परंतु शिवसेनेला भाजपबरोबरच जायची इच्छा नसली तरी त्यांना जावे लागणार आहे.''

पुणे  - देश आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलू पाहत आहेत. नवे समीकरणे आकाराला आले तर देशाचा राजकीय इतिहास बदलेल, असे सूतोवाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. 

लोकनेते संभाजीराव काकडे गौरव समितीच्या वतीने माजी खासदार संभाजीराव काकडे यांचा चव्हाण यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री दादा जाधवराव, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन पाटील, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर, महापौर मुक्ता टिळक, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शरद पाटील आणि कंठवती काकडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी अलीकडच्या काळातील राजकारणात पद व पैशाला आलेले महत्त्व यांच्यावर भाष्य करतानाच काकडे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

शहर व जिल्ह्याच्या राजकारणात संभाजीराव यांची भूमिका नेहमीच किंगमेकरची राहिली, असे सांगून चव्हाण म्हणाले,""देशात आणि राज्यात नवी समीकरणे होऊ पाहत आहेत. ही ती आकाराला आली तर नवा इतिहास घडणार आहे. पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. तुमच्या अनुभव आणि मार्गदर्शनाची गरज आहे.'' 

डॉ. आढाव म्हणाले,""आजच्या राजकारणात खूप धुकं साठले आहे. ते दूर केले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. महत्त्वाकांक्षी असलेल्या नेत्यांकडून हे काम होणे शक्‍य वाटत नाही. ते बाजूला सारण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही पुढे या.'' दादा जाधवराव म्हणाले,"" राजकारणात पदे सोडणारी माणसे दुर्मीळ असतात. काकडे यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली असतानाही त्यांनी ती नाकारली.'' 

थोपटे म्हणाले,""काकडे यांनी राजकारण हे समाजकारणासाठी वापरले. आजच्या राजकीय नेत्यांना राजकारण म्हणजे फुलांचा रस्ता वाटतो. राजकारण म्हणजे खडतर रस्ता आहे.'' या वेळी हर्षवर्धन पाटील आणि डी. वाय. पाटील यांचे भाषण झाले. 

सदानंद शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. बुवा नलावडे यांनी आभार मानले. 

सच्चाईने वागा - काकडे 
संभाजी काकडे म्हणाले,""जीएसटी आणि नोटाबंदीने शेतकऱ्यांचे वाटोळे केले. एकीकडे महागाई वाढत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. गरीब निर्माण करण्याचे काम सुरू आहे. देशातील कमी लोकांकडेच 73 टक्के संपत्ती आहे. संपत्ती ही विनाशाकडे नेणारी आहे. जीवनाचा एकच मंत्र आहे सच्चाईने वागा. पैशाच्या मागे धावू नका.'' 

Web Title: pune news prithviraj chauhan congress shiv sena politics