दप्तरेही झाली कार्टूनमय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

मुलांची आवड दरवर्षी बदलत असल्याने वेगवेगळ्या प्रकारची दप्तरे सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. दप्तर आणि सॅकमध्ये यंदा अनेक प्रकार पाहायला मिळतील. कार्टूनची चित्रे असलेल्या दप्तरांना अधिक मागणी आहे. सॅकमध्ये जिन्स, कॉटन जिन्स, कापडी, वॉटरप्रूफला मोठी मागणी आहे. ब्रॅन्डेड कंपनीच्या सॅकदेखील आहेत. बालवाडीतील चिमुकल्यांसाठी तर कार्टून शेप सॅक तयार करण्यात आल्या आहेत.
- प्रफुल्ल जगताप, विक्रेता

पुणे : ‘छोटा भीम’, ‘डोरेमॉन’, ‘मिकीमाउस’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बार्बी’, ‘बेनटेन’ या कार्टूनची आकर्षक दप्तरे बाजारात दाखल झाली आहेत. ही दप्तरे वजनाला हलकी आणि मजबूत अशी आहेत. मे महिना संपत आल्याने पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागले आहेत. कार्टूनचा प्रभाव इतका आहे की, बाजारात दप्तरेसुद्धा कार्टूनमय बनविण्यात आली आहेत.  

शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिल्याने पालकांची मुलांच्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सध्या २०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत विविध प्रकारची दप्तरे उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांनी दप्तरांचे विविध प्रकार बाजारात आहेत. आडव्या दप्तरांची ‘क्रेझ’ कमी झाली असून, दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या ‘सॅक’च्या डिझाईन्सला महत्त्व प्राप्त होत आहे. खाऊचा डबा, कंपास पेटी ठेवण्यासाठी कप्पे, वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन याबरोबर आतील वह्या, पुस्तके ठेवण्याचे कप्पे याची पाहणी करूनच दप्तरांची खरेदी केली जात आहे. दप्तर पावसाळ्यात भिजू नये, म्हणून रेन कव्हरचीही खरेदी केली जात आहे. 

‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य
लहान मुलांसाठी टॉईजचा वापर करून विशिष्ट कार्टूनच्या आकाराची तयार केलेली छोटीशी ‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य आहे. ही सॅक वजनाला हलकी आणि मजबूत असल्यामुळे दप्तराचे ओझे होणार नाही. त्यामुळे या सॅकला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  

Web Title: Pune News Pune Education news school education