पुरंदर तालुक्यातील ५ रस्त्यांसाठी ११ कोटींना मंजुरी- शिवतारे

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नावळी ते चवरेवाडी हा रस्ता हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तो जिल्हा परिषदेच्या आखत्यारीत असल्याने त्यावर काम करण्यास मला मर्यादा होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून या अडचणीवर मात करण्यात मी यशस्वी झालो असून आता या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १ कोटी ७६ लाख ६२ हजार रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे.
- विजय शिवतारे

सासवड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ११ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच या कामांना सुरवात करण्यात येईल; अशी माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

शिवतारे म्हणाले; पुरंदर तालुक्यातील जेजुरी, कुंभारकरवाडी, दोरगेवाडी, साकुर्डे या गावांना जोडणाऱ्या  रस्त्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. या रस्त्याच्या कामाला २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पश्चिम पट्यातील वारवडी, दरेवाडी व पठारवाडी यांना जोडणारा रस्तादेखील मंजूर करण्यात आलेला असून साडेचार किलोमीटर लांबी असलेला हा रस्ता ४ कोटी रुपये खर्चून डांबरीकरण केला जाणार आहे. नावळी ते चवरेवाडी हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तो जिल्हा परिषदेच्या आखत्यारीत असल्याने त्यावर काम करण्यास मला मर्यादा होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून या अडचणीवर मात करण्यात मी यशस्वी झालो असून आता या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १ कोटी ७६ लाख ६२ हजार रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे. सासवड -कापूरहोळ रस्त्यापासून कुंभोशी गावात जाणाऱ्या रस्त्यावर मागील काळात काही निधी खर्च करून त्याची डागडुजी करण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र रस्त्याची लांबी अधिक असल्याने त्यास पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता. या रस्त्याला १ कोटी ४८ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या गावाची समस्या मिटली आहे. अशाच पद्धतीने पानवडी ते पागेवाडी या रस्त्यासाठी १ कोटी २२ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. सध्या शिवरी – शिंदेवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

खड्ड्यांमुळे तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले होते. त्यांची डागडुजी सुरु करण्यात आलेली असून नाबार्ड, अर्थसंकल्प, विशेष दुरुस्ती अशा विविध योजनांमधून तालुक्यातील सुमारे २० कोटीहून अधिक रक्कमेच्या इतर कामांची सुरुवात येत्या पंधरवड्यात करण्यात येणार आहे; असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: pune news purandar saswad fund grants vijay shivtare