नाट्यपदांतून उलगडला रंगभूमीचा सुवर्णकाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे - ‘पंचतुंड नररुंड माळधर’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सूरत पियाँ की छिन बिसुराई’, ‘गुलजार नार ही मधुबाला’....संगीत नाटकांच्या शृंखलेतील ही नाट्यपदे... विलंबीनाम संवत्सराच्या प्रारंभाला... अर्थातच चैत्र शुद्ध पाडव्याला गायक राहुल देशपांडे नाट्यपदे सादर करत होते अन्‌ श्रोत्यांमधून वन्समोअरही येत होता...

पुणे - ‘पंचतुंड नररुंड माळधर’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सूरत पियाँ की छिन बिसुराई’, ‘गुलजार नार ही मधुबाला’....संगीत नाटकांच्या शृंखलेतील ही नाट्यपदे... विलंबीनाम संवत्सराच्या प्रारंभाला... अर्थातच चैत्र शुद्ध पाडव्याला गायक राहुल देशपांडे नाट्यपदे सादर करत होते अन्‌ श्रोत्यांमधून वन्समोअरही येत होता...

मुहूर्त होता गुढीपाडव्याचा... संगीत नाटकांच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीला उत्तम संगीत नाटके पाहायला मिळावीत, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने विशेष संगीत नाट्य महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. सहप्रायोजक होते. या महोत्सवाची सांगता राहुल यांनी गायलेल्या संगीत नाटकांतील नाट्यपदांनी झाली. 

पूर्वरंग आणि उत्तररंगातून राहुल यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे आणि संगीत नाटकांचे अनोखे नाते रसिक प्रेक्षकांसमोर उलगडून सांगितले. बाबूराव माने, बालगंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा वसंतराव देशपांडे यांच्यावर झालेला प्रभाव, त्यांच्यातील उत्तम नकलाकार, पु. ल. देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर यांनी आपल्या गायनाबद्दल सुचविलेल्या सूचना आणि संगीत नाटकांत भूमिका करण्याचा घेतलेला निर्णय याविषयी राहुल भरभरून बोलले. वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, राम मराठे यांनी त्यांच्या गायकीतून अजरामर केलेली नाट्यपदेही त्यांनी गायिली. तब्बल तीन तास संगीत नाट्यपदांच्या स्वरांची मोहिनी घालणाऱ्या राहुल यांनी भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. ‘लोकमान्य’चे सहायक प्रादेशिक व्यवस्थापक हर्षद झोडगे यांच्या हस्ते राहुल यांच्यासह प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (संवादिनी) यांचाही सत्कार करण्यात आला.

तरुणाईला संगीत नाटकांची मोहिनी
नाट्य संगीताला पूर्वी राजाश्रय होता. आता लोकाश्रय मिळाला आहे. आपल्याला संगीत नाटकांची परंपरा आहे. पूर्वी ज्या प्रमाणे संगीत नाटके सादर होत होती. त्या वेळीही श्रोतृवर्ग होता आणि आताही आहे. तरुणाईला नाट्य संगीताची मोहिनी पडू लागली आहे. हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. मी लहानपणी पिंपळखरे बुवांकडे सहा वर्षे गायन शिकलो. आजोबांची तसबीर समोर ठेवून आठ-आठ तास रियाज करीत असे. महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. तेव्हा ‘पावना-वामना’ हे पद मी बसविले. कुमार गंधर्वांची गायकी मला खूपच आवडायची. माझे गाणे ऐकायला भाईकाका अर्थातच पु. ल. देशपांडे आमच्या घरी यायचे. पुढे मग कीर्तन, ठुमरी, दादरा, बंदिशी, 
वृत्त आणि नाट्यपदांच्या गायकीची पद्धत जाणून घ्यायला लागलो. प्रत्येक गायकाची गायनशैली निराळी असते. बालगंधर्व, अभिषेकी बुवा, वसंतराव यांचीही शैली वेगळी होती. त्यांना पंडित ही पदवी शोभते. कारण ती सर्व मातब्बर मंडळी होती, असा उल्लेखही राहुल देशपांडे यांनी केला.

‘सकाळ’चे कौतुक 
संगीत नाटकांना परंपरा आहे. ती जतन करणे आपले कर्तव्य आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने संगीत नाट्य महोत्सव भरवून, संगीत नाटकांतील नाट्यपदे सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ‘सकाळ’चे मी मनापासून अभिनंदन करतो, असे गौरवोद्‌गारही राहुल देशपांडे यांनी काढले.

Web Title: pune news rahul deshpande