कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी येत्या मंगळवारी (ता. 26) पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येत्या गुरुवारी (ता. 28) कोकणात तुरळक भागात पावसाच्या सरी पडण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील चिपळूण, देवरुख, सावंतवाडी आणि कणकवली या भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातही पन्हाळा, कोल्हापूर, गगनबावडा, सांगली या भागात पावसाच्या काही सरी पडल्या. मराठवाड्यातील मुखेड, तर विदर्भातील हिंगणघाट आणि बाभूळगाव येथे पाऊस पडला.

राज्याच्या बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतल्याने कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदविले. राज्यात कमाल तापमान चंद्रपूर येथे 35.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुण्यात उन्हाचा चटका वाढला
शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत सरासरीइतका नोंदलेला कमाल तापमानाचा पारा आता वाढला आहे. त्यामुळे शहरात उन्हाचा चटकाही वाढला आहे. शहरात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होऊन 32.2 अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा पारा मात्र सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने कमी नोंदला गेला आहे. 17.7 अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झाली.

Web Title: pune news rain