पावसानंतर निसरड्या रस्त्यांचा दुचाकीस्वारांना धोका

मंगेश कोळपकर
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - शहरात दोन दिवसांपूर्वी अचानक हलका पाऊस पडला. त्यामुळे २५-३० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या सुमारे १०० घटना घडल्या. त्यात काही वाहनचालकांना दुखापतही झाली. त्या दिवशी जहाँगीर रुग्णालयात पाच-सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याशिवाय किरकोळ दुखापत होण्याचेही अनेक प्रसंग घडले आहेत. अचानक पाऊस आल्यास शहरातील रस्त्यांवर नेमके काय घडते, याचा विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून घेतलेला आढावा.

पुणे - शहरात दोन दिवसांपूर्वी अचानक हलका पाऊस पडला. त्यामुळे २५-३० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या सुमारे १०० घटना घडल्या. त्यात काही वाहनचालकांना दुखापतही झाली. त्या दिवशी जहाँगीर रुग्णालयात पाच-सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याशिवाय किरकोळ दुखापत होण्याचेही अनेक प्रसंग घडले आहेत. अचानक पाऊस आल्यास शहरातील रस्त्यांवर नेमके काय घडते, याचा विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून घेतलेला आढावा.

असा होतो शरीरावर परिणाम 
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘निसरड्या रस्त्यावर वाहने घसरून चालकांना दुखापत होण्याच्या अनेक घटना दोन दिवसांपूर्वी घडल्या. सहा रुग्णांवर जहाँगीरमध्ये उपचार सुरू आहेत. अशा अपघातांतून मुकामार तसेच हाडे आणि सांध्यांच्या दुखापती होतात. काही वेळा दुचाकी घसरल्यावर तिचे वजन संबंधित चालकाच्या अंगावर पडते. त्यामुळे स्नायूंवर ताण पडतो किंवा जबर दुखापत होते. वाहन वेगात असेल, तर गंभीर दुखापत होऊ शकते. हेल्मेट डोक्‍यावर नसल्यास अनेक अपघातांत डोक्‍याला जबर दुखापत होते तसेच शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांनाही इजा होते. निसरड्या रस्त्यावर वाहने घसरल्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते.’’

अधिक इंजिन क्षमता अन्‌ हलकी वाहने 
सध्या अधिक इंजिन क्षमतेची दुचाकी वाहने उपलब्ध आहेत. ती वजनाने हलकी आहेत. त्यामुळे ताशी ४०-५० किलोमीटर इतका वेग क्षणार्धात गाठता येऊ शकतो. १२५-१५० सीसी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या मोटारसायकलीही उपलब्ध आहेत. घसरणाऱ्या दुचाकींमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे. 

मोठ्या व लहान चारचाकी वाहनांतून ऑइलचे काही थेंब पडतात. हलक्‍या पावसामुळे ऑइल आणि पाणी यांच्या मिश्रणामुळे चिकटपणा निर्माण होतो आणि त्यावरून दुचाकी वाहने घसरतात. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची मानसिकता बदलत नाही. कोरड्या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहन चालविण्याचा ते प्रयत्न करतात अन्‌ दुचाकी घसरू शकते. सिमेंटच्या रस्त्यावर प्लॅस्टिकची एखादी कॅरिबॅग जरी चाकाखाली आली तरी ते वाहन घसरते.
- ए. व्ही. मन्नीकर, वरिष्ठ उपसंचालक, एआरएआय

उन्हाळ्यात सर्वत्र धुळीचे प्रमाण जास्त असते. त्यातच मोठ्या वाहनांतून गळणारे ऑइल रस्त्यावर पडते. हलका पाऊस होतो तेव्हा धूळ, ऑइल आणि पाण्याच्या मिश्रणातून चिकट द्रव तयार होतो. त्यामुळे दुचाकी वाहने घसरतात; परंतु सलग पाऊस असल्यास धूळ आणि ऑइल वाहून जाते.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

हलका पाऊस पडल्यावर परवा २५-३० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. त्या प्रत्येक ठिकाणी पाच-सहापेक्षा जास्त वाहने घसरली असावीत, असा अंदाज आहे. ऑइल आणि पाण्यामुळे दुचाकी घसरतात. त्यावर माती किंवा लाकडाचा भुसा टाकून ती ठिकाणे सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.
- प्रशांत रणपिसे, अग्निशामक अधिकारी  

रविवारी हलका पाऊस झाला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावर ढोले पाटील चौकातून गोळीबार मैदानाच्या दिशेने जात होतो. ऑइल सांडल्यामुळे दुचाकी घसरताना दिसत होत्या, म्हणून मीपण दुचाकी हळू चालवत होतो. पेट्रोल पंपाजवळ अचानक दुचाकी घसरली. सुदैवाने पत्नी-मुलाला दुखापत झाली नाही. परंतु, माझ्या छातीला, पायाला जबर मार बसला. तातडीने वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे पुढचा धोका टळला. परंतु, निसरड्या रस्त्याची दहशत बसली. 
- निशांत शेठ, व्यावसायिक

हलका पाऊस झाल्यावर अशी घ्या काळजी 
 वाहनाचा वेग ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा 
 अचानक ब्रेक दाबणे किंवा अचानक वेग वाढवू नये 
 डांबरी अथवा सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर वाहन जपून चालवा 
 वळणावर वाहनाचा वेग कमी असावा 
 पावसाळा सुरू होण्यापूर्वी टायर तपासून घ्यावा 
 चाकात पुरेशी हवा असावी 
(हरीश अनगोळकर, अध्यक्ष, फिटर मोटरसायकल रिपेअर्स रिसर्च असो.) 

Web Title: pune news rain vehicle slip accident danger