गडकरींचा पुतळा केव्हा बसवणार? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर संभाजी उद्यानात साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवू, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती. पुतळा फोडून वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप गडकरी यांच्या पुतळ्याबाबत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे गडकरी यांचा पुतळा केव्हा बसवणार, असा प्रश्‍न पुन्हा एकदा सांस्कृतिक क्षेत्रातून उपस्थित होत आहे. 

संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. या घटनेला वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातच गडकरी यांचा मंगळवारी (ता. 23) स्मृतिदिन आहे. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. कलावंतांनी स्वखर्चाने गडकरी यांचा पुतळा तयार करून तो पालिकेला दिला होता. तरीही तो बसविला नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुतळ्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले होते. मात्र, कार्यवाही झाली नाही. 

नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, ""या विषयासंदर्भात महापौरांशी आम्ही कलावंत भेटलो होतो; पण त्या आमचे हात बांधले गेलेले आहेत, असे म्हणाल्या होत्या.'' 

नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ""पुतळा पुन्हा बसवावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, महापौर यांना सर्व कलावंतांच्या वतीने पत्र दिले होते. त्यानंतर पुतळा बसवावा, असा सर्व पक्षीय ठरावही पालिकेत मांडण्यात आला होता; पण पुतळा अद्याप बसवला गेला नाही. यासंदर्भात राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून अधिक वेळकाढूपणा होऊ नये. तातडीने पुतळा बसविण्यात यावा.'' 

राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडून वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात पुतळा पुन्हा बसला नाही, याची लाज वाटतेय. आमच्यातील अनेक कलावंत सुखा-समाधानात आहेत. नाट्य परिषद तर निवडणुकीत गुंतलीय; पण हे सगळे या प्रकरणाबाबत सध्या "ब्र'सुद्धा काढत नाहीत. निषेधाचे पत्रकही प्रसिद्ध करत नाहीत. याचीही मनात खंत आहे. 
- अमोल पालेकर, अभिनेते-दिग्दर्शक 

Web Title: pune news ram ganesh gadkari sambhaji park