पाषाणची पुष्करणी प्रवाहित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - राम नदी स्वच्छता समितीच्या तरुणांनी रविवारी (ता. २४) श्रमदानाने पाषाण-सोमेश्‍वरवाडी येथील सोमेश्‍वर मंदिरामागे असलेल्या ऐतिहासिक पुष्करणीच्या परिसराची स्वच्छता केली. या पुष्करणीमध्ये पाणी येणाऱ्या छोट्या तलावात वाढलेली जलपर्णी, वेली, गवत व राडारोडा काढण्यात आला. त्यामुळे पुष्करणीचा प्रवाह सुरू झाला.

पुणे - राम नदी स्वच्छता समितीच्या तरुणांनी रविवारी (ता. २४) श्रमदानाने पाषाण-सोमेश्‍वरवाडी येथील सोमेश्‍वर मंदिरामागे असलेल्या ऐतिहासिक पुष्करणीच्या परिसराची स्वच्छता केली. या पुष्करणीमध्ये पाणी येणाऱ्या छोट्या तलावात वाढलेली जलपर्णी, वेली, गवत व राडारोडा काढण्यात आला. त्यामुळे पुष्करणीचा प्रवाह सुरू झाला.

मुळशी तालुक्‍यातील भुकूम येथे उगम पावलेल्या राम नदीच्या स्वच्छतेसाठी राम नदी स्वच्छता अभियान समिती गेली दोन वर्षे काम करत आहे. शनिवारी (ता. २४) भुकूम येथील पुष्करणीची स्वच्छता करून या वर्षीच्या अभियानाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर रविवारी नदीच्या उगमापासून १५ किलोमीटरवर असलेल्या पाषाण येथील सोमेश्‍वर मंदिरामागील पुष्करणीची स्वच्छता करण्यात आली.

या ऐतिहासिक पुष्करणीची रचना अतिशय सुंदर आहे. चारही बाजूंनी दगडी चिऱ्यांचे बांधकाम असून, आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दक्षिण बाजूला पाणी पुरवणारा छोटा तलाव आहे. राम नदीतून येणारे पाणी पुष्करणीच्या अगोदर छोट्या तलावात येते. तेथून पुष्करणीत जाते व पुढे पुन्हा राम नदीत बाहेर पडते. या तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी व वेली वाढल्या होत्या. राडारोडाही मोठ्या प्रमाणात होता. तरुणांनी स्वच्छता केल्यामुळे पुष्करणी प्रवाहित झाली. 

या मोहिमेत अनिल पवार, शांताराम इंगवले, मारुती कोकाटे, मधुकर दळवी, जिंदा सांडभोर, मनोज भागवत, शैलेंद्र पटेल, अनिल गायकवाड, राहुल इंगवले, प्रवीण तांगडे, मनोहर सणस, गौरव गावडे, महेश मालुसरे, संजय पवार, अमर धुमाळ, गोरख माझिरे, प्रवीण पवार, शरद इंगळे, मयूर सणस, बापू गुरव, विशाल सुर्वे, तुषार पवार, किरण करंजावणे, तेजस पवार आणि ॲक्‍मे मॅनेजमेंट कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

२ ऑक्‍टोबरला संपूर्ण नदीची स्वच्छता 
राम नदी स्वच्छता समितीच्या वतीने २ ऑक्‍टोबरला राम नदीच्या १७ किलोमीटरच्या पात्रात सकाळी ८ ते १२ या वेळात विविध ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. ३ ऑक्‍टोबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत भुकूमचे रामेश्‍वर मंदिर ते पाषाणच्या सोमेश्‍वर मंदिरापर्यंत जलदिंडी काढण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अनिल पवार यांनी केले. 

Web Title: pune news ram river cleaning campaign