'सातबारा'मध्ये विविधतेत एकात्मता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - राज्यातील सर्व विभागांमध्ये सातबारा उतारा वेगवेगळा लिहिण्याची पद्धत आता बंद होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर कशा नोंदणी कराव्यात, याबाबत तलाठ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व सातबारा एकसमान असणार असून, सर्वसामान्य माणसाला समजण्यास सोपे जाणार आहे.

सातबारा उतारा हा जमीन मालकी हक्क पुरावा म्हणून अनेक शासकीय खात्यांमध्ये वापराला जातो. त्यावरून जमिनीच्या मालकापासून विविध प्रकारच्या नोंदी असतात. यात प्रामुख्याने गावाचे नाव, भोगवटदाराचे नाव, गट क्रमांक अथवा सर्व्हे नंबर, भूधारणा पद्धती, जमिनीचे क्षेत्र, कुळाचे नाव, इतर अधिकार, बोजा, अटी व शर्ती, जमीन तारण ठेवली आहे का, पिकाखालील क्षेत्राचा तपशील, जिरायती की बागायती, पोटखराब, जलसिंचनाचे साधन इत्यादींची नोंद असते. मात्र राज्यात वेगवेगळ्या भागांत सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात मयत व्यक्तीच्या नावाला कंस (ब्रॅकेट) घालण्याऐवजी नावावर काट मारतात किंवा गोल करतात. अमरावती विभागात सातबारा ऐवजी 6/2 या नमुन्यामध्ये तो लिहितात. 6 नंबर म्हणजे गाव नमुना आणि 2 म्हणजे बिगरशेती नोंद, अशी पद्धतीनुसार या भागात सातबारा उतारा लिहिला जातो. मयत व्यक्तीनंतर एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये सर्व वारसांची नोंद घेण्याऐवजी फक्त थोरल्या मुलाचीच नोंद सातबारावर केली जाते. त्यापुढे एकत्र कुटुंब पुढारी (एकुपु) अशी नोंद काही भागात केली जाते. हा आतारा लिहिण्याच्या राज्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत; तसेच काही ठिकाणी पिकांच्या नोंदी या बोलीभाषेनुसार केल्या जातात.

बिगरशेती जमीन असेल, तर सातबारा उतारा वेगळा करणे आवश्‍यक आहे; परंतु तसे न केल्यामुळे सातबारा उताऱ्यावर 200 ते 400 नावांची नोंद आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडतो. बिगरशेतीच्या सातबारावर जमिनीचे क्षेत्र हे आर चौरसमीटरमध्ये नोंद केले जाते. त्यानुसार जमीन महसूल आकारण्यात येतो. मात्र अजूनही राज्यात बिगरशेतीचा सातबारा वेगळा केला जात नाही. त्यामुळे जमीन महसूल बुडला जातो. आता सातबारा लिहिण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. बिगरशेतीचे सातबारा उतारे वेगळे होणार असून, या नागरिकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार आहे.

पिकांची नावेही एकसमान
बुलडाणा भागामध्ये ज्वारीला दादर म्हणतात. सातबारा उताऱ्यावर ज्वारीऐवजी दादर लिहिले जाते आणि त्या पिकाचे क्षेत्र लिहिले जाते. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र नेमकी किती आहे, याची आकडेवारी समजत नाही. असेच प्रकार कापूस, तांदूळ यासह विविध पिकांच्या बाबतीत घडतात. या पिकांची नोंद बोली भाषेत घालण्यात येत असल्यामुळे राज्यात कोणत्या पिकाची किती लागवड झाली, यांची माहिती मिळण्यास कृषी खात्याला अडचण येते. हे सर्व थांबणार असून, कृषी विभागाच्या माहितीनुसार पिकांचे नाव लिहिले जाणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971मधील तरतुदींनुसार सातबारा उतारा कसा लिहावा, अभिलेख कसा ठेवावा, यासाठीची नियमावली तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक सातबारा उतारा लिहिणे आवश्‍यकच आहे. आता ऑनलाइन सातबारा उतारा देण्याचे काम सुरू आहे. हे उतारे अद्ययावत ठेवण्यासाठीची आज्ञावली 2002मध्ये तयार केली आहे. सातबारा उतारे हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नियमाप्रमाणे लिहिण्याच्या सूचना तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा भूमी अभिलेख विभागाचे प्रकल्प समन्वयक

हे होणार फायदे
* सातबारा उताऱ्यामध्ये चुकीच्या नोंदी थांबणार
* शेतजमिनीचे दावे कमी होण्यास मदत होणार
* राज्यात कोणत्या पिकांचे किती क्षेत्र हे कळणार
* पिकांची अचूक आकडेवारी समोर येणार
* करआकारणी सोपी होणार

Web Title: pune news saat bara