स्वप्नपूर्तीसाठी गवसले नवे आकाश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे - आज त्या परिसासारख्या भासत होत्या...उत्साहाने भरलेल्या...जिद्द अन्‌ आत्मविश्‍वासाची कमतरता त्यांच्यात नव्हती...स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश त्यांना गवसले होते...रॅम्प ही त्यांच्यासाठी कौशल्य दाखविण्याची एक संधी होती. रॅम्पवर कौशल्याची मुक्त उधळण करत त्यांनी उपस्थितांचीही दाद मिळवली. सौंदर्य अन्‌ कौशल्याची एक वेगळी जुगलबंदी येथे रंगली होती. त्यातून शेकडोंच्या करिअरला एक सोनेरी वाटही मिळाली.

पुणे - आज त्या परिसासारख्या भासत होत्या...उत्साहाने भरलेल्या...जिद्द अन्‌ आत्मविश्‍वासाची कमतरता त्यांच्यात नव्हती...स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश त्यांना गवसले होते...रॅम्प ही त्यांच्यासाठी कौशल्य दाखविण्याची एक संधी होती. रॅम्पवर कौशल्याची मुक्त उधळण करत त्यांनी उपस्थितांचीही दाद मिळवली. सौंदर्य अन्‌ कौशल्याची एक वेगळी जुगलबंदी येथे रंगली होती. त्यातून शेकडोंच्या करिअरला एक सोनेरी वाटही मिळाली.

निमित्त होते ‘सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेच्या निवड चाचणी फेरीचे. पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील तरुणींनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सौंदर्यासह बौद्धिक गुणांचीही चुणूक दाखवली.

आत्मविश्‍वासाने ‘रॅम्प वॉक’ करत मोजक्‍या शब्दांत त्यांनी स्वतःची ओळखही करून दिली. मोहरलेले सौंदर्य आणि कमालीची जिद्द घेऊन ‘महाराष्ट्रा’च्या तरुणींनी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणींनीही आपल्या सौंदर्याने उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली. पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. व्हाइट शर्ट, ब्लू जीन्स आणि हाय हिल घातलेल्या तरुणी रॅम्पवर निर्भीडपणे वावरत होत्या. एक एक करून तरुणी रॅम्पवर येत होत्या अन्‌ अवघ्या तीस सेकंदांत परीक्षकांवर छाप पाडत होत्या. 

काही तरुणींनी कल्पकता दाखवून स्वतःची वेगळी स्टाइल दाखविण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीत तरुणींनी रॅम्प वॉक केला आणि आपली ओळख करून दिली. काहींनी मराठीतून ओळख सांगितली; तर काहींनी ठसकेबाज मराठीतून ओळख करून मराठी बाणा जपला. सकाळपासून प्राथमिक फेरीसाठी तरुणींची गर्दी पाहायला मिळाली. रॅम्प वॉकनंतर झालेल्या ‘टॅलेंट हंट’ फेरीत तरुणींनी नृत्य, गायन आणि अभिनयाची चुणूक दाखवली.

त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या तरुणींनी परीक्षकांच्या प्रश्‍नांची निर्भीडपणे उत्तरे दिली. परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना या तरुणी आत्मविश्‍वासाने सामोऱ्या गेल्या. परीक्षकांचे कौतुक करायलाही या सर्वजणी विसरल्या नाहीत. आर्किटेक्‍ट, डॉक्‍टर, इंजिनिअर, आयटी अशा विविध क्षेत्रांतील तरुणींनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली चमक दाखवली.
एकूणच या स्पर्धेत तरुणींचा जोश, जल्लोष आणि वेगळे काही करण्याची ऊर्मी पाहायला मिळाली. स्वप्नांसाठीचे व्यासपीठ म्हणून त्यांनी ‘सकाळ’च्या या स्पर्धेचे आवर्जून कौतुकही केले. काही तरुणींची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.

प्रायोजकांच्या प्रतिक्रिया
‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेतून तरुणींसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण झाले आहे. छोट्या शहरातील तरुणींसाठी ही सुवर्णसंधी असून, राज्यभरातील तरुणींना यात आपले कौशल्य सादर करता येत असल्याचा आनंद आहे. ‘सकाळ’ने स्पर्धेचे योग्य नियोजन केले आहे. 
- श्रुती महादेव, फॅशन डिझायनर, डिझाईन ॲण्ड कॉस्च्युम पार्टनर

सुहास्य हे सौंदर्य खुलवते. त्यामुळे अशा स्पर्धेत तरुणींनी सुहास्य घेऊन उतरले पाहिजे. हसणे हे आयुष्य असून, त्यातून आपले व्यक्तिमत्त्व प्रभावीरीत्या प्रकट होते. म्हणून सुहास्य हा मॉडेलिंगचा एक भाग असून, तो अधिक खुलविला पाहिजे.
- डॉ. मनीषा गरुड, संचालिका, हायटेक डेंटल क्‍लिनिक, स्माइल पार्टनर

येथील तरुणी हुशार असून, त्यांच्याकडे सौंदर्याची कमतरता नाही. ‘सकाळ’ने ही स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्या कलेला वाव दिला आहे. स्पर्धेतून तरुणींना करिअरचा एक पर्याय निवडता येईल.
- डॉ. विशेष नायक, संचालक, स्टार्स कॉस्मेटिक्‍स, मेकअप पार्टनर

‘सकाळ’ हे खूप मोठे व्यासपीठ आहे. म्हणूनच या स्पर्धेशी संलग्न होण्यात मोठा आनंद आहे. तरुणींमधील कौशल्य जवळून पाहायला मिळत आहे. ग्रुमिंग सेशनमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होतील, यात शंका नाही. 
- लीना खांडेकर, संचालिका, लीझ ब्युटी सेंटर ॲण्ड स्पा, हेअरस्टाइल पार्टनर

परीक्षक म्हणतात...
पूर्वी आपण पाश्‍चिमात्य मॉडेलिंगचे अनुकरण करायचो. पण आता आपण बदललो आहोत. मॉडेलिंगमध्ये आपण स्वतःची ओळख निर्माण करत आहोत. याचा प्रत्यय या स्पर्धेत आला. तरुणींचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व विकासासह जिद्द आणि आत्मविश्‍वास दिसून आला.
- लवेल प्रभू, इव्हेंट डायरेक्‍टर

‘सकाळ’च्या सौंदर्य स्पर्धेत खूप टॅलेंट पाहायला मिळाले. सुशिक्षित तरुणींसह ग्रामीण भागातील तरुणींचाही उत्साह पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुणी येथे आल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेत वैविध्य होते. शहरासह ग्रामीण भागातील तरुणींची वेगळीच जुगलबंदी पाहता आली. 
- सौरभ गोखले, अभिनेता

तरुणींसाठी अशा व्यासपीठाची गरज आहे. या व्यासपीठावरून तरुणींना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. म्हणूनच ‘सकाळ’ने ही स्पर्धा आयोजित केली हे खूप महत्त्वाचे आहे. तरुणींसाठी ही स्पर्धा एक टर्निंग पॉइंट ठरू शकेल.
- श्रुती पाटोळे, मिसेस युनिव्हर्स कॉन्फिडंट

मॉडेलिंगचे क्षेत्र तसे आव्हानात्मक आहे, पण आपल्यात टॅलेंट असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, हेच या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. उत्साह आणि आत्मविश्‍वासासह आयुष्यात काही करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. त्यांची मेहनत यावेळी पाहता आली. पुण्यातील तरुणींनी दिलेला प्रतिसाद भन्नाट होता.
- श्‍वेता राज, मॉडेल

स्पर्धक तरुणींचे मत
मुलींना पुढे जाण्याची संधी मिळाली तर त्या खूप काही करू शकतील अशी व्यासपीठे आज निर्माण होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ‘सकाळ’ने आयोजित केलेली ही स्पर्धा. यात खेड्यासह शहरातील तरुणींचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत सहभागी होऊन मलाही आनंद झाला.
- नेहा शिरसाट

मी काही वर्षांपासून मॉडेलिंग करत आहे. हे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी यात तरुणींसाठी करिअरचा पर्याय निर्माण झाला आहे. तरुणींनी मॉडेलिंग क्षेत्रात यायला हवे. मॉडेलविषयीचा दृष्टिकोन आज बदलला असून, ही स्पर्धा हाच दृष्टिकोन बदलण्याचे काम करत आहे.
- प्रिया सिंग

भारतात अजूनही मुलीला चूल आणि मूल या चौकटीत बसवले जाते. पण, मला असे वाटते की, प्रत्येक मुलीला तिला हवे तसे जगण्याचा आणि करिअर निवडण्याचा अधिकार आहे. मला मॉडेल व्हायचे असून, त्यासाठीच मी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
- राजगौरी कांचन

प्रत्येक मुलीकडे वेगळे कौशल्य असते. पण, रूढी-परंपरांमुळे त्यांना संधी मिळत नाही. आपण त्यांच्या स्वप्नांना अवकाश दिला पाहिजे. दबाव टाकण्यापेक्षा त्यांना संधी द्यायला हवी. एका संधीमुळे त्यांचे आयुष्य बदलू शकते, हेच या स्पर्धेत जाणवले.
- समृद्धी जाधव

पालकांचा दृष्टिकोन बदलला
पूर्वी या क्षेत्राबद्दल आमच्या मनात वेगळीच भीती होती. मात्र, आज आम्हा पालकांचाही दृष्टिकोन बदलत आहे. मुलींनी आपल्या कौशल्याने पालकांचा हा दृष्टिकोन बदलला आहे. ‘सकाळ’सारखे खात्रीशीर व्यासपीठ असेल तर मुलींना आम्हीही निर्धास्त होऊन स्पर्धेत सहभागी होण्यास पाठिंबा देत आहोत.
- सुषमा गायकवाड, पालक 

Web Title: pune news sakal beauty of maharashtra 2018