‘ससून’च्या अकरा मजली इमारतीच्या कामाला गती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पुणे - ससून रुग्णालयात नव्याने उभारण्यात येणाऱ्या अकरा मजली इमारतीच्या कामाला गती मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या असून, पहिल्या टप्प्यात ६५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ‘ड्राफ्ट टेंडर पेपर’ (डीटीपी) तयार करून अंतिम मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या बांधकामासाठी आवश्‍यक निविदा वेळेत काढल्या नाहीत. त्यामुळे या कामाला ‘ब्रेक’ लागल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या प्रकल्पाला गती देण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अकरा मजली इमारतीमध्ये अत्यावश्‍यक कामासाठी ६५ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ‘डीटीपी’हा पहिला टप्पा आहे. त्याला अंतिम मान्यता मिळण्यासाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नव्या इमारतीमधील शस्त्रक्रिया कक्षाचे काम प्राधान्याने पूर्ण होणार आहे. तसेच, रुग्णालयासाठी अत्यावश्‍यक वेगवेगळी वैद्यकीय उपकरणे, फर्निचर खरेदीसाठी ही निविदा प्रक्रिया असेल.

नवीन इमारतीमध्ये सर्वांत वरच्या मजल्यावर आठ शस्त्रक्रिया कक्ष आहेत. हे कक्ष अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व तांत्रिक घटकांचा या निविदेत समावेश केला जाईल, अशीही माहिती देण्यात आली.

वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू
सरकारी क्षेत्रातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यातून सर्वांत मोठे आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारले जाणार आहे. या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांनी वेळेत निर्णय घेतले नसल्याने काम रेंगाळल्याचे समोर येत आहे. त्या बाबतही प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याचे समजते.

Web Title: pune news sasoon 11 the floor building work start