ससून रुग्णालय आमूलाग्र बदलणारः डॉ. चंदनवाले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

पुणे: "कमी खर्चात रुग्णांना चांगल्या दर्जाची अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. रुग्ण आणि विद्यार्थी हेच या विकासाचे केंद्रबिंदू आहेत. दर्जेदार वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि संशोधन ही या विकासाची त्रिसूत्री आहे,'' असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पुणे: "कमी खर्चात रुग्णांना चांगल्या दर्जाची अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. रुग्ण आणि विद्यार्थी हेच या विकासाचे केंद्रबिंदू आहेत. दर्जेदार वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि संशोधन ही या विकासाची त्रिसूत्री आहे,'' असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

"सकाळ आठवड्याची मुलाखत'च्या निमित्ताने डॉ. चंदनवाले यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. आधुनिक काळात वैद्यकीय खर्च हा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांसाठी ससूनसारखी मोठी रुग्णालये ही आशेची किरणे आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय सक्षम करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याकडे डॉ. चंदनवाले यांनी लक्ष वेधले.

ते म्हणाले, ""ससून हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून ससून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सामाजिक, धार्मिक संस्था आणि उद्योग यांच्या मदतीने रुग्णांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, मेंदू शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर जखमी रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था "ट्रॉमा केअर सेंटर'मधून केली जात आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्याबरोबरच परिसरातील रुग्ण उपचारांसाठी येत आहेत.''
महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबद्दल बोलताना ते म्हणाले, ""कर्नाटक व गुजरातमध्ये महाविद्यालयांच्या स्वायत्ततेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तीन अतिविशेष उपचार सेवा उपलब्ध आहे. त्याचा विस्तार व्हावा, फेलोशिप अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी व संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती करण्यासाठी स्वायत्तता आवश्‍यक आहे. स्वायत्ततेमुळे हे काम अधिक गतिमान होईल.''

रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलताना स्थानिक पातळीवरील नेमक्‍या गरजा काय आहेत, याची अचूक माहिती असणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने भविष्यात सुपरस्पेशालिटी सुविधा वाढविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

स्वच्छता वाढली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "स्वच्छ भारत अभियान'चा चांगला परिणाम ससून रुग्णालयात झाल्याचे दिसून येते. या रुग्णालयात सर्व स्तरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे स्वच्छता हे मोठे आव्हान होते. पण, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांनी स्वच्छतेसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातून ससून चकाचक झाले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या आहेत, असे डॉ. चंदनवाले यांनी स्पष्ट केले.

सांघिक प्रयत्नाचे फळ
कोणताही बदल घडवायला वेळ लागतो. त्यासाठी लोकसहभाग आवश्‍यक असतो. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातून ससून रुग्णालयाची प्रतिमा बदलत आहे.

Web Title: pune news Sassoon hospital will change radical: Dr. Chandanwale