सीताफळ उत्पादक आता तज्ज्ञांसमोरही बोलू लागले...

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत जाधववाडी - दिवे (ता. पुरंदर) येथील संशोधन केंद्राने विकसित केलेली.. 'फुले पुरंदर' ही संकरित जातच सीताफळ लागवडीला योग्य आहे. त्यातूनच रोग - किडी व विविध समस्यांवर मात होऊ शकते. सीताफळात अलीकडे मर रोग आला आहे. त्यावर मात करण्याचे आव्हान आहे.

सासवड : सीताफळ हे पुरंदर तालुक्यातील पारंपरीक कोरडवाहू फळपिक. मात्र अलीकडे या फळपिकाला इतके बाजारमुल्य मिळाले की.. शेतकरीही जागृत झाले. त्यामुळे सासवड (ता. पुरंदर) येथे झालेल्या सीताफळ कार्यशाळेत.. मार्गदर्शक तज्ज्ञ, अधिकारी बोललेच.. पण शेतकरीही जागृकतेने बोलले. शेतकऱयांनी सीताफळ व्यवस्थापनातील माहिती चांगली दिल्याने तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले. 

राज्यात व देशातही प्रसिध्द असलेल्या पुरंदर सीताफळात सध्या विविध समस्या निर्माण होत आहेत. तरीही बाजारमुल्याच्या दृष्टीने हे सीताफळ श्रेष्ठ ठरत आहे. सासवडला घाऊक बाजारात रोज दोन हजार क्रेट सीताफळे येत आहेत. तर तालुक्यातून इतर गावांतून हजार क्रेट विक्रीला जात आहेत. या पार्श्वभूमीवर सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका पंचायत समितीच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सीताफळ कार्यशाळा नुकतीच घेतली. त्यात तज्ज्ञ डाॅ. विकास खैरे यांच्या संगतीने तज्ज्ञ डाॅ. सुनिलो लाहोटी व शेतकरी सुरेश सस्ते, बाळासाहेब गरुड, सागर काळे, माणिक झेंडे, विजय कोंढाळकर आदी शेतकरी खुप चांगले बोलले. यावेळी आत्माचे संचालक सुनिल बोरकर, तालुका कृषी अधिकारी, अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे अधिकारी सुनिल लाहोटी, आत्माचे सहायक व्यवस्थापक गणेश जाधव, स्मिता वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. 

राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत जाधववाडीच्या अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे निवृत्त प्रकल्प अधिकारी डाॅ. विकास खैरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की., सीताफळात विविध शिफारस न केलेल्या जाती आणून अधिक उत्पादनांचे अमिष दाखविले जाते. मात्र राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत जाधववाडी - दिवे (ता. पुरंदर) येथील संशोधन केंद्राने विकसित केलेली.. `फुले पुरंदर` ही संकरित जातच सीताफळ लागवडीला योग्य आहे. त्यातूनच रोग - किडी व विविध समस्यांवर मात होऊ शकते. सीताफळात अलीकडे मर रोग आला आहे. त्यावर मात करण्याचे आव्हान आहे. मिलीबग, फळसड यावर मात करण्यासाठी सीताफळ पिक व्यवस्थापनात शेतकऱयांनी लक्ष घातले तर सीताफळासारखे उत्पादन कशातच नाही. यावेळी डाॅ लाहोटी म्हणाले., छाटणीच्या वेळीच मागील वर्षाची काळी फळे काढून ती नष्ट करावीत. झाडांवर 110 पेक्षा अधिक फळे न ठेवता त्याची विरळणी करावी. लहान फळे कमी करावीत. प्रारंभीपासून बोर्डो मिश्रणचा वापर करावा. यावेळी सुनिल बोरकर म्हणाले., जीवामृताचा वापर वाढविल्यास सीताफळाला चांगले दिवस येतील. कोणतेही रोग किड कमी होताना.. उत्पादन वाढ दिसेल. त्यासाठीच गावरान गायींसह सेंद्रीय शेती फायद्याची ठरेल. सीताफळात तर ही सेंद्रीय शेती बाजारमुल्य अजून वाढवून देईल. 

झाडाखाली वाढवा जीवाणू फॅक्टरी : देशमुख
कृषी विभागाच्या `आत्मा` प्रकल्पाचे उप प्रकल्प संचालक अनिल देशमुख म्हणाले., सीताफळात झाडाखाली जीवाणू फॅक्टरी तयार करा. ती करण्यासाठी जीवामृत वापरा. त्यातून झाडांची अन्नरस घेण्याची क्षमता वाढते. त्यातून गुणवत्तापूर्ण सीताफळे तयार होतील, हा माझा अनुभव आहे. डाळींबासारखी समस्या यातून सीताफळात दिसणार नाही, हा माझा दावा आहे.  

Web Title: pune news saswad harit compost brand approved