शाळांमध्ये रंगली पंतप्रधानांची "परीक्षा पे चर्चा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी भीती, दडपण असते. पण, विद्यार्थ्यांनी परीक्षेतील तणावापासून मुक्त व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पहायला मिळाले. प्रत्यक्षात भाषण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणताही दंगा, गोंधळ न करता कान देऊन पंतप्रधान काय सांगत आहेत, हे ऐकलेच. परंतु, त्याबरोबर आपल्या वह्यांमध्ये टिपणेही काढली.

पुणे - परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी भीती, दडपण असते. पण, विद्यार्थ्यांनी परीक्षेतील तणावापासून मुक्त व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पहायला मिळाले. प्रत्यक्षात भाषण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणताही दंगा, गोंधळ न करता कान देऊन पंतप्रधान काय सांगत आहेत, हे ऐकलेच. परंतु, त्याबरोबर आपल्या वह्यांमध्ये टिपणेही काढली. शहरातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोदी यांचे भाषण टीव्ही, प्रोजेक्‍टर अशा विविध माध्यमातून दाखविण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "परीक्षेतील तणाव कसा कमी करता येईल,' विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहरातील शाळांमध्ये टीव्ही, प्रोजेक्‍टर, स्क्रीन याद्वारे हा कार्यक्रम दाखविण्यात आला. "परीक्षा पे चर्चा' या उपक्रमांतर्गत हा संवाद रंगला. सकाळी अकरा ते दुपारी बारा यावेळेत होणारा हा संवाद साधारणत: दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होता. विद्यार्थ्यांना तणावमुक्त कसे रहावे, या विषयी संवाद साधण्यात मोदी रंगले खरे! परंतु, त्यामुळे काही शाळांचे वेळापत्रक मात्र कोलमडले. 

स्थानिक पातळीवर दहावी-बारावीच्या तोंडी परीक्षा सुरू असलेल्या शाळा आणि दुबार भरणाऱ्या शाळा, यांचे वेळापत्रक सांभाळता-सांभाळता शिक्षक आणि समन्वयकांना तारेवरची कसरत करावी लागली. पंतप्रधान काय आणि कसा संवाद साधणार, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे पहायला मिळाले. कार्यक्रम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत विद्यार्थ्यांनी मोठ्या एकाग्रतेने संवाद ऐकला आणि महत्त्वाचे मुद्देही लिहून घेतले. कार्यक्रमानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. भाषणातील महत्त्वाच्या मुद्यांवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण श्रवणीय होते. त्यात संदेशाबरोबरच महत्त्वाच्या टिप्सही होत्या,'' असे काही शिक्षकांनी सांगितले. लक्ष्मणराव आपटे प्रशालेत खासदार अनिल शिरोळे यांनी उपस्थितीत राहून हा संवाद पाहिला. या वेळी मुख्याध्यापिका डेविड तेरेसा, पर्यवेक्षिका मेधा सिन्नरकर, कार्यवाह अजित गायकवाड, शिक्षणाधिकारी गणपत मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: pune news school student