विज्ञानकडून कला शाखेकडे कल वाढला

संतोष शाळिग्राम
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीसाठी कला शाखेला प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. हे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे महाविद्यालयांचे निरीक्षण आहे. स्पर्धा परीक्षेत पात्र झाल्यानंतर मिळणारी हक्काची आणि प्रतिष्ठेची नोकरी याचे आकर्षण विद्यार्थ्यांना आहे. 

पुणे - बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीसाठी कला शाखेला प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. हे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे महाविद्यालयांचे निरीक्षण आहे. स्पर्धा परीक्षेत पात्र झाल्यानंतर मिळणारी हक्काची आणि प्रतिष्ठेची नोकरी याचे आकर्षण विद्यार्थ्यांना आहे. 

बारावीनंतर अभियांत्रिकी पदवी, पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी असा प्रवाह गेली काही वर्षे होता. परंतु अभियंता झाल्यानंतरही नोकरी मिळण्याची शाश्‍वती नसल्याने अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी असा पर्याय आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात मूळ धरू लागला आहे. त्याचा परिणाम या वर्षीच्या प्रवेशातून दिसू लागला आहे.

पुण्यातील काही प्रमुख महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची माहिती घेतली असता, विज्ञान शाखेकडून पदवीसाठी कला शाखेला मागणी वाढू लागल्याचे प्राचार्य सांगतात. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धा परीक्षांच्या ओढीने शहरातील महाविद्यालयांमध्ये कला शाखेला प्रवेश घेत आहेत. शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचे खासगी क्‍लास, अभ्यासाची सुविधा सहज उपलब्ध असल्याने शहरात आल्याचे विद्यार्थी सांगतात, असे प्राचार्यांचे निरीक्षण आहे.

बारावीनंतर कला शाखेकडील कल निश्‍चितपणे वाढला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी एखादा खासगी क्‍लासला लावायचा आणि त्या जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, असे विद्यार्थी करीत आहेत. कला शाखेला प्रवेश घेतल्यावर राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषा यांचा अभ्यास होतो. कला शाखेत प्रवेश घेतल्यास या परीक्षांच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळही मिळतो, अशी विद्यार्थ्यांची धारणा आहे. साधारणपणे बारावीमधील (विज्ञान) २०-२५ टक्के मुले कला शाखेला प्राधान्य देत आहेत.
- डॉ. आर. एस. झुंजारराव, (प्राचार्य, मॉडर्न महाविद्याय)

विज्ञान शाखा अवघड वाटते म्हणूनही विद्यार्थी कला शाखेकडे वळतात. पण या वर्षी स्पर्धा परीक्षांसाठी शाखा बदलण्याचे प्रमाण अधिक आहे. ते सुमारे ३० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. आमच्या महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी शाखा बदलली आहे. अन्य गावांहून पुण्यात आलेले विद्यार्थ्यांनाही कला शाखा हवी आहे. स्पर्धा परीक्षांचे आकर्षण मुलांमध्ये निर्माण करण्यात खासगी क्‍लासचे मार्केटिंग प्रभावी ठरत आहे, हेही या बदलाचे कारण आहे.
- डॉ. मुक्तजा मठकरी, (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आकर्षण आहे. शहरी विद्यार्थी भाषेचे ज्ञान घेतल्यानंतर विदेशी कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या संधीचा विचार करतात. जपानी, चिनी, जर्मन आदी भाषा कला शाखेत शिकायला मिळतात. यामुळे त्या देशांतील कंपन्यांमध्ये नोकरी आणि त्या त्या देशात जाऊनही करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे पदवी प्रथम वर्षासाठी कला शाखेला २० टक्‍क्‍यांनी मागणी वाढली आहे.
- डॉ. दिलीप सेठ,  (प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय)

मी ग्रामीण भागातील आहे. आम्हाला मुलांचे आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न असते. त्यामुळे मी बारावीला ८६ टक्के गुण असतानाही प्रथम वर्षासाठी कला शाखा निवडली. बारावीपर्यंत माझा विज्ञानाचा पाया पक्का झाला आहे. आता पदवीला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास-भूगोल असल्याने स्पर्धा परीक्षेसाठी आवश्‍यक ज्ञान मला मिळेल. मी अभियांत्रिकी शाखेला गेला असतो, तर त्या अभ्यासक्रमाची चार वर्षे आणि पुढे दोन-अडीच वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागली असती. कला शाखेला प्रवेश घेतल्याने हे शिक्षण घेता घेता मला त्या परीक्षेची तयार करता येणार आहे. म्हणून मी या शाखेकडे वळलो आहे.
- कपिल झिंजार्डे (बोरगाव, बीड)

Web Title: pune news Science has increased trend in the arts branch