काश्‍मीरमध्ये साहित्यातून एकतेचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

दुसरे घुमान बहुभाषा संमेलनाचे २३ व २४ सप्टेंबरदरम्यान आयोजन

पुणे - दहशतवाद, हिंसाचाराच्या घटनांनी धगधगणाऱ्या; पण भारताचा मुकुट समजल्या जाणाऱ्या काश्‍मीरमध्ये (श्रीनगर) ‘दुसरे घुमान बहुभाषा संमेलन’ होणार आहे. यानिमित्ताने भाषा, साहित्य या माध्यमातून जगभरात एकतेचा संदेश पोचवला जाणार आहे. यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे.

घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर बहुभाषा संमेलनाची कल्पना पुढे आली. भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यांना एकत्र जोडणे आणि त्यातून एकता, बंधुभाव प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. हा विचार पुढे ठेवून मागील वर्षी घुमानमध्ये ‘पहिले घुमान बहुभाषा संमेलन’ घेण्यात आले. भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. घुमाननंतर आता हे संमेलन काश्‍मीरमध्ये २३ व २४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. 

स्थळ व तारखांची घोषणा ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार आणि संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख, साहित्यिक राजन खान यांनी केली.
खान म्हणाले, ‘‘घुमान हे नाव संत नामदेवांशी संबंधित आहे. संत नामदेवांनी देश जोडण्याचे काम केले. आपल्याला संमेलनाच्या माध्यमातूनही देश जोडण्याचे, लोकांना जवळ आणण्याचेच काम करायचे आहे. त्यामुळे या संमेलनाचे ‘घुमान बहुभाषा संमेलन’ असे नाव असेल. ते पुढेही कायम राहील. हे संमेलन एक वर्ष घुमानमध्ये तर पुढच्या वर्षी अन्य राज्यात होईल. त्यानुसार यंदा काश्‍मीरची निवड केली आहे. देशातील महत्त्वाचे लेखक, कलावंतांना या संमेलनासाठी बोलावणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे.’’

संमेलनाध्यक्षपदी गुलजार ?
‘‘साहित्याच्या माध्यमातून ऐक्‍याचा धागा गुंफला जावा, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. आजवर ज्या लेखक, कवीने देश जोडण्याचे काम केले आहे, अशा मान्यवरांनाच संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने दिले जाते. यंदा गीतकार गुलजार यांचे नाव आमच्यासमोर आहे. त्यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे,’’ असे संजय नहार यांनी सांगितले.

Web Title: pune news second ghuman bahubhasha sammelan