शिक्रापुरात बांधकाम साहित्य खरेदीची गुंडांकडून सक्ती

भरत पचंगे
शनिवार, 17 मार्च 2018

शिक्रापूर (ता. शिरूर, पुणे) : "माझीच वाळू घ्यायची, माझेच पाणी घ्यायचे, मी सांगेन तेच स्टील वापरायचे आणि मी सांगेन त्याच भावात सर्व बांधकाम मटेरियल खरेदी करायचे,' अशी दादागिरी शिक्रापुरात नवीन बांधकाम करणाऱ्यांवर सुरू आहे. शिक्रापूर पोलिसांकडूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराने अनेक जण हैराण झाले आहेत.

शिरूर तालुक्‍यात सर्वांत वेगाने वाढणारे गाव म्हणून शिक्रापूरची ओळख आहे. पाच वर्षांपूर्वी साधारण पंधरा-अठरा हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या 30 ते 40 हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. या ठिकाणी राहायला येणाऱ्यांचे प्रमाण वर्षाकाठी 15 ते 20 टक्के एवढ्या मोठ्या गतीचे आहे. अशा स्थितीत गावकारभाऱ्यांचे स्थानिक राजकारण काहीही असले, तरी त्यांचा उपद्रव बाहेरच्या व्यक्तीला कधीच झाला नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शिक्रापुरात नवीन घरे बांधणारांना एका वेगळ्याच धमक्‍यांना सामोरे जावे लागत आहे.

याबाबत सुरवातीला दबक्‍या आवाजात चर्चा होती. मात्र, मागील आठवड्यात एका पत्रकाराच्या नातेवाईकालाच या धमक्‍यांचा सामना करावा लागल्याने हे प्रकरण आता थेट पोलिसांपर्यंत पोचले आहे. मात्र या गुंडांकडून, "तुम्ही कुणालाही सांगा आम्ही घाबरत नाही. पोलिसांना तर आम्ही थेट पैसे देतो, त्यामुळे ते आमचे काहीच बिघडवू शकत नाहीत,' अशी अरेरावी केली जात आहे. धमक्‍यांमुळे अनेक जण भीतीच्या सावटाखाली आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिक्रापूर पोलिस काय भूमिका घेतात, त्याची उत्सुकता आहे.

कुणीही असूद्या तक्रार द्या, जेरबंद करतो!
याबाबत पोलिस निरीक्षक रमेश गलांडे म्हणाले, ""शिक्रापुरात अशी कुठलीच आणि कुणाचीच दहशत सहन केली जाणार नाही. जो कुणी असे प्रकार करतोय त्याच्या नावाने कुणीही थेट तक्रार करावी, त्यावर कारवाई करून त्याला जेरबंद करू. अर्थात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि या प्रकारात कोणत्या पोलिसांच्या नावाने दादागिरी केली जातेय त्याचाही शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.''

Web Title: pune news shirur shikrapur new home material goon police