सरदारांच्या वंशजांची मानवंदना

सरदारांच्या वंशजांची मानवंदना

पुणे - ‘प्रणाम तुळजा भवानीला... कुलस्वामिनीला’, ‘जय भवानी, जय शिवाजी...,’ असा स्वराज्याचा जयजयकार करीत सरदारांच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सनई-चौघडे, ढोलताशा, बॅण्डच्या सुरावटी, मर्दानी खेळ, तुतारीच्या ललकारीच्या साथीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ६५ सरदार घराणी, मावळे, वीरमाता, रजपूत राजांचे वंशज आणि सर्वधर्मीय नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.  

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा आयोजिला होता. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, डी. वाय. पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, नामदेव शिरगावकर, दिलीप मोहिते, दीपक मानकर, अरविंद शिंदे, सुनील मारणे, ॲड. प्रताप परदेशी, पराग मते, प्रवीण परदेशी उपस्थित होते. 

सरदार, मावळे आणि वीरमातांचे स्फूर्तिदायक स्वराज्यरथ, शिवगर्जना ढोलताशा पथक, महाराणी ताराराणी शौर्य पथकाच्या रणरागिणींनी सादर केलेली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ५१ रणशिंगांची ललकारी आणि पारंपरिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्त, अशा वातावरणात ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषात आसमंत दुमदुमून निघाला. 

एसएसपीएमएस येथील छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. समितीतर्फे आयोजित मिरवणुकीचे यंदा सहावे वर्ष होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. पारंपरिक वेशभूषेतील तरुण-तरुणी सेल्फी काढत आनंदोत्सवाचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते.  सरसेनापती वीर बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे, कृष्णाजी नाईक बांदल, येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निवंगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडू शिक्केकरी, आढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सूर्याजी काकडे, हंबीरराव मोहिते, बाजीप्रभू
देशपांडे, संताजी घोरपडे, गोदाजी जगताप, सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरुक, नागोजीराव कोकाटे, माने सरकार, हिरोजी इंदुलकर, राऊतराव ढमाले, खंडोजी मानकर, दयाजीराव मारणे, गंभीरराव, नावजी बलकवडे, धाराऊ गाडे, कान्होजी आंग्रे, शिवाजी इंगळे, विठोजी चव्हाण, भोई बांधव, लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, लुखजीराव घारे, संभाजी काटे, निंबाळकर घराणे, जगद्‌गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती-शक्ती स्वराज्यरथ, हरजीराजे महाडिक, संभाजी कोंढाळकर, पिलाजी गोळे, प्रतापराव गुजर, वाघोजी तुपे, पिलाजीराव शिर्के, छत्रसाल बुंदेला धारदेवास, पवार घराणे, दमाजीराव गायकवाड, महादजी शिंदे, बहिर्जी नाईक, शिवा काशीद, जीवा महाले, जीवाजी सुभानजी रणनवरे, मल्हारजी तुकोजी निगडे, एकोजी शिरोळे यांचे वंशज मिरवणुकीत सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे महात्मा फुले मंडई येथून एसएसपीएमएस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून रयतेच्या राजाला अभिवादन केले. सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित
गणपती ट्रस्ट (सरदार विंचूरकरवाडा) तर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com