चांदणी चौकात शिवसृष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुण्यात शिवसृष्टी उभारण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मकच आहे. कोथरूडऐवजी ती चांदणी चौकात होईल. पुढील प्रक्रिया वेगाने केली जाईल. ज्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणार आहे.
- देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री

पुणे - चांदणी चौकातील जैवविविधता प्रकल्पाच्या (बीडीपी) ५० एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत केली. विशेष म्हणजे, जागा ताब्यात घेऊन शिवसृष्टीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुढील तीन महिन्यांत कार्यवाहीला सुरवात होण्याची शक्‍यता आहे.

‘बीडीपी’चे आरक्षण असलेल्या जागामालकांना मोबदला देण्याची प्रक्रिया लवकर करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे शिवसृष्टी उभारण्याचे आठ वर्षांपासून रखडलेले काम आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, शिवसृष्टीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मेट्रोचे काम बंद करण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले. दरम्यान, महापालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

शिवसृष्टी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे नामकरण
मेटोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचे नाव आता शिवसृष्टी ते रामवाडी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे येथील मेट्रो मार्ग आता शिवसृष्टी ते रामवाडी नावाने ओळखला जाईल. या मार्गाला शिवसृष्टीचे नाव देण्याची मागणी दीपक मानकर यांनी केली होती.

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक
शिवसृष्टीच्या कामाला वेग देण्यासाठी ‘बीडीपी’च्या जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहेत. तसेच अन्य कामांसाठी महापालिका स्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येईल. त्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून कामे मार्गी लावण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या सूचनांनुसार पुण्यात बैठक होणार आहे.

मेट्रोलाही मिळणार गती
कोथरूड कचरा डेपोच्या २८ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने याआधी मंजूर केला आहे. मात्र याच जागेवर मेट्रोचे स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसृष्टीकडे दुर्लक्ष करून मेट्रोचे काम वेगाने सुरू करण्यात आल्याचा आक्षेप घेत या जागेत दोन्ही प्रकल्प उभे करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी लावून धरली होती. राज्य सरकार आणि महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शिवसृष्टीला प्राधान्य देत नसल्याचे सांगत, महापालिकेतील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. एवढेच नव्हे, तर आठवडाभरात शिवसृष्टीबाबत निर्णय न घेतल्यास मेट्रोचे काम थांबविण्याचा इशारा मानकर यांनी दिला होता. त्यामुळे मेट्रोच्या कामात अडथळा होण्याची शक्‍यता आहे.

मेट्रो, शिवसृष्टीबाबत अखेर निर्णय
मेट्रो, डेपो आणि शिवसृष्टीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्‍ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक दीपक मानकर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. कोथरूड येथील जागेऐवजी चांदणी चौकातील ‘बीडीपी’च्या जागेत शिवसृष्टी उभारण्याबाबत महापालिका आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू होती. पण तोही निर्णय लांबणीवर पडला होता.

विशेष बाब म्हणून बांधकामास परवानगी
जैवविविधता प्रकल्पात बांधकामाला परवानगी नाही; मात्र शिवसृष्टीसाठी विशेष बाब म्हणून बांधकामाला परवानगी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे; तसेच येथील जागामालकांना मोबदला देण्यासाठी पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा; तसेच पुढील कार्यवाही वेगाने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

शिवसृष्टी उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेली शिवसृष्टी लवकर मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

शिवसृष्टी उभारण्याबाबत आग्रही भूमिका होती. चांदणी चौकातील ‘बीडीपी’च्या पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे; तसेच या प्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे आता मेट्रो आणि शिवसृष्टी हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन.
- गिरीश बापट, पालकमंत्री

शिवसृष्टी उभारण्याबाबत आधीपासूनच सकारात्मक भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे प्रकल्पाला गती येणार आहे. पुणेकरांची शिवसृष्टी लवकरच साकारली जाईल. विशेष बाब म्हणून ‘बीडीपी’त प्रकल्प साकारण्याला परवानगी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यावर कार्यवाही होईल. हा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार.
- मुक्ता टिळक, महापौर

शिवसृष्टीसाठी बीडीपीची ५० एकर जागा व पुणे मेट्रोच्या डेपोसाठी कोथरूड येथील कचरा डेपोची जागा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे मेट्रो आणि शिवसृष्टी हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील. कोथरूडच्या व पर्यायाने पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. 
- संजय काकडे, खासदार

शिवसृष्टी साकारण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. हे दोन्ही प्रकल्प उभारले जातील. ‘बीडीपी’ची जागा ताब्यात घेताना योग्य मोबदला देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. 
- मेधा कुलकर्णी, आमदार

पुण्याच्या प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्र्यांचा नेहमीच पुढाकार असतो, त्यातून शिवसृष्टीला प्राधान्य देऊन पुणेकरांच्या मागणीचा आदर केला आहे. त्यामुळे शिवसृष्टीच्या प्रत्यक्ष कामासाठी पुरेशी अधिक तरतूद करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करू. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

प्रलंबित शिवसृष्टी करण्याच्या पुणेकरांच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीचा निर्णय घेतला. हा प्रकल्प उभारण्यात अडथळे येणार नाहीत, यासाठीचे नियोजन केले जाईल.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेता

शिवसृष्टी ‘बीडीपी’त उभारण्याचा निर्णय मान्य आहे. मात्र, ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे पैसे उपलब्ध होतील का, याचा विचार झाला पाहिजे. या प्रकल्पाच्या कामात आता कोणताही अडथळा येऊ नये. या कामात राजकारण आणणार नाही. पुढील प्रक्रिया लवकर व्हावी, हीच अपेक्षा आहे.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेता, महापालिका

शिवसृष्टी उभारण्याला वेळ लागला असला, तरी अत्यंत चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. मात्र भूसंपादन, प्रकल्प आराखडा वेगाने तयार करून अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करावी. त्यामुळे शिवसृष्टी उभी राहणार आहे. मेट्रो स्थानक व शिवसृष्टीचे भूमिपूजन एकाच वेळी करावे.
- दीपक मानकर, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news shivsrusti in chandani chowk