...ही दरी मला फार त्रास देतेय - डॉ. श्रीराम लागू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मारुती कांबळेचे काय झाले? 
‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या गाजलेल्या संवादाचा उल्लेख करत विखे- पाटील म्हणाले, ‘‘मारुती कांबळेचे काय झाले?’ याचे चित्रपटातील उत्तर पुढे मिळाले; पण राजकारणरूपी चित्रपटातील या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप आम्हाला आणि जनतेलाही मिळालेले नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने अनेक आश्‍वासने दिली होती, ती पूर्ण व्हायला तयार नाहीत. त्यामुळे ‘मारुती कांबळे’चा प्रश्‍न आम्ही वारंवार उपस्थित करू.’’

पुणे - वाढते वय आणि थकवा यामुळे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू रंगमंचावर जाणे टाळतात; पण अनेक दिवसांनी ते रंगमंचावर आले. तेवढ्यात ‘आपण काही बोलणार का’, असा प्रश्‍न त्यांना विचारला जातो. त्यावर ‘फार नाही’, असे सांगत डॉ. लागू नेमक्‍या शब्दांत गरिबीवर भाष्य करतात. ‘ही दरी मला फार त्रास देत आहे,’ असे सांगत ते सर्वसामान्यांना सतावणाऱ्या प्रश्‍नांवर बोट ठेवतात; पण यानिमित्ताने या वयातही त्यांनी व्यक्त केलेली सामाजिक जाणीव पाहून अख्खे सभागृह त्यांना टाळ्यांचा कडकडाट करत दाद देते.

हा प्रसंग अनुभवता आला यंदाच्या पुणे नवरात्र या सोहळ्यात. डॉ. लागू यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते ‘महर्षी पुरस्कार’ बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ‘‘आपण मस्त खुर्चीवर बसून नाटक पाहतो; पण त्याच नाट्यगृहाबाहेर एक माणूस भीक मागत जमिनीवर बसलेला असतो, हे चित्र फार त्रास देत आहे. यावर काही उपाय आहे का? तुमच्याकडे असेल तर तो मला सांगा...’’ असे म्हणत अजूनही रस्त्यावर उतरण्याची तयारीच त्यांनी मनोगतातून दाखवली.

विखे- पाटील म्हणाले, ‘‘आपली सामाजिक परिस्थिती ही मन खिन्न करणारी आहे, तीच डॉ. लागू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. ‘देवाला रिटायर करा’, असे परखड भाष्य करण्याची हिंमत डॉ. लागू यांच्यातच आहे. त्यामुळे कला क्षेत्राबरोबर सामाजिक चळवळीचा इतिहास त्यांच्याशिवाय लिहिताच येणार नाही.’’ या वेळी अभिनेते प्रदीप वेलणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेत्री ज्योती सुभाष, दीपा लागू, रजनी वेलणकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, आयोजक आबा बागूल उपस्थित होते.

Web Title: pune news Shreeram Lagoo