‘स्मार्ट सिटी’ला लवकरच गती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर राजेंद्र जगताप यांचे प्रतिपादन

पुणे - पायाभूत सुविधांचे जाळे आणि नागरी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे स्मार्ट सिटी होय. या प्रकल्पाची गती पहिल्या टप्प्यात मंद आहे, असे काही जणांना वाटत असले, तरी लवकरच दृश्‍य स्वरूपात येत्या पाच वर्षांत पुण्याचे रूपांतर ‘स्मार्ट’ शहरात झालेले दिसेल, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 
(सीईओ) राजेंद्र जगताप यांनी येथे केले. 

‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर राजेंद्र जगताप यांचे प्रतिपादन

पुणे - पायाभूत सुविधांचे जाळे आणि नागरी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे स्मार्ट सिटी होय. या प्रकल्पाची गती पहिल्या टप्प्यात मंद आहे, असे काही जणांना वाटत असले, तरी लवकरच दृश्‍य स्वरूपात येत्या पाच वर्षांत पुण्याचे रूपांतर ‘स्मार्ट’ शहरात झालेले दिसेल, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 
(सीईओ) राजेंद्र जगताप यांनी येथे केले. 

राज्य सरकारने जगताप यांची नुकतीच ‘सीईओ’ म्हणून नियुक्ती केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर जगताप यांनी वाचकांशी संवाद साधला. स्मार्ट सिटी म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असेल, स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेले उपक्रम, होत असलेले बदल, भविष्यातील योजना, तंत्रज्ञानाचा सहभाग आणि लोकसहभागाचे स्वरूप याबाबत वाचकांनी विचारलेल्या प्रश्‍नांनाही जगताप यांनी उत्तरे दिली. स्मार्ट सिटी कशी असावी, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना तब्बल १२ लाख पुणेकरांनी उत्तरे दिली होती. त्या प्रक्रियेत ‘सकाळ’च्या तनिष्कांनीही मोठा सहभाग नोंदविला होता, असे जगताप यांनी नमूद केले.  

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचा राष्ट्रीय कार्यक्रम २५ जून २०१६ रोजी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यावेळी उद्‌घाटन झालेल्या प्रकल्पांपैकी लाइट हाऊस, स्मार्ट स्ट्रिट, स्मार्ट एलिमेंट (मोफत वायफाय, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, पॅनिक बटन) हे पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. यातील काही प्रकल्प नागरिकांच्या सेवेत असल्याचेही जगताप यांनी नमूद केले. शहरातील सार्वजनिक वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी इलेट्रॉनिक बस वापरण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

पीएमपी सक्षम करण्यासाठी मी कार्ड सुरू झाले आहे, तसेच प्रवाशांसाठी ॲप कार्यान्वित झाले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात ‘ट्रान्स्पोर्ट हब’ची निर्मिती करण्यात येत असून, त्यात बस, एसटी, रिक्षा आदींना सामावून घेण्यात येत आहे. तसेच मेट्रोला पूरक वाहतूक व्यवस्था पीएमपीकडून निर्माण करण्यात येत असल्याचेही जगताप यांनी नमूद केले. 

जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) गेल्या दहा वर्षांत रस्ते, पाण्याचे प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, बीआरटी आदी योजना मार्गी लागल्या. आता या पायाभूत सुविधांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून जोडण्यात येत आहे. तसेच निर्माण झालेल्या सुविधांचा पुरेपूर वापर करण्यावर भर दिला जात आहे, असेही जगताप यांनी नमूद केले. 

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी कोणतीही करवाढ करण्यात येणार नाही. काही सुविधा वापरण्यासाठी मात्र वाजवी शुल्क आकारले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक, पाणीपुरवठा आणि आता घनकचरा व्यवस्थापनावर सध्या भर दिला जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शहरातील कचऱ्याची समस्या दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. 

‘अमृत’मध्ये पायाभूत प्रकल्प
स्मार्ट सिटीमध्ये औंध, बाणेर आणि बालेवाडी या भागाची पहिल्यांदा निवड झाली असली, तरी येत्या पाच वर्षांत तेथील विकास योजना पूर्ण होतील. त्यानंतर शहरातील दुसऱ्या एखाद्या भागाची निवड करून त्याचा विकास होईल. एकाच वेळी दोन किंवा तीन भागही निवडणे शक्‍य असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. शहरातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news smart city speed