सोशल मीडियामुळे वडिलांचा शोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

केशवनगर - ‘आजोबा तुमचे नाव काय? तुम्ही कोठून आलात?’ अशी विचारपूस रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेल्या एका वृद्धाकडे ‘त्या’ने केली. त्या आजोबांना काही तरी सांगायचे होते; परंतु तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. त्या तरुणाने आजोबांच्या हातात कागद व पेन दिला... आजोबांनी थरथरत्या हातांनी कागदावर स्वतःचे नाव अहमद मण्यार व पत्ता कोठुरे, ता. निफाड असे लिहिले.. हातातल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या साह्याने या आजोबांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय त्या वेळी त्या तरुणाने घेतला आणि संपर्क क्रमांकासह त्यांचे चित्रीकरण व्हायरल केले.. काही तासांतच आजोबांच्या मुलाचा फोन आला आणि त्यांची गळाभेट झाली.

केशवनगर - ‘आजोबा तुमचे नाव काय? तुम्ही कोठून आलात?’ अशी विचारपूस रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेल्या एका वृद्धाकडे ‘त्या’ने केली. त्या आजोबांना काही तरी सांगायचे होते; परंतु तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. त्या तरुणाने आजोबांच्या हातात कागद व पेन दिला... आजोबांनी थरथरत्या हातांनी कागदावर स्वतःचे नाव अहमद मण्यार व पत्ता कोठुरे, ता. निफाड असे लिहिले.. हातातल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या साह्याने या आजोबांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय त्या वेळी त्या तरुणाने घेतला आणि संपर्क क्रमांकासह त्यांचे चित्रीकरण व्हायरल केले.. काही तासांतच आजोबांच्या मुलाचा फोन आला आणि त्यांची गळाभेट झाली. माणुसकी जिवंत असल्याचे पुन्हा दाखवून देणाऱ्या या तरुणाचे नाव आहे प्रवीण प्रधान. 

रस्त्यावर सापडलेल्या मण्यार आजोबांना घरी नेत प्रवीण यांनी त्यांची चांगली सेवा केली. चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर नातेवाइकांकडून खातरजमा केल्यावर थेट त्या आजोबांच्या मुलाशी संपर्क साधला गेला. मुलाचे नाव होते चांदमिया अहमद मण्यार. चांदमियाची फेसबुकवर मेसेंजर व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या वडिलांसोबत भेट घडवून दिली. नाशिकमधून दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वडिलांना भेटण्यासाठी मुलगा केशवनगरकडे निघाला. त्यांनी प्रवीण यांचे आभार मानले. याप्रसंगी विशाल प्रधान, शक्ती प्रधान, राहुल प्रधान, चेतन प्रधान, नदाफ शेख उपस्थित होते.

प्रवीण प्रधान म्हणाला, ‘‘माणुसकीच्या नात्याने मी त्या आजोबांची विचारपूस केली. यात मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्यांच्याकडून जी माहिती मिळाली, त्यावर मी प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नांना यश आले. माझ्या या कामात मला कुटुंबीय आणि मित्रांनी मदत केली.’’

चांदमिया मण्यार म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी व माझे नातेवाईक वडिलांना शोधत होतो. वडील पुण्यात केशवनगरमध्ये सापडल्याचा फोन नातेवाइकांकडून आल्यावर विश्‍वासच बसत नव्हता. जेव्हा व्हिडिओ कॉलवर पाहिले, तेव्हा खूप आनंद झाला. आज खऱ्या अर्थाने अजूनही माणुसकी जिवंत आहे असेच वाटते.’’

Web Title: pune news social media