‘मायलेकरं’ने घेतला हृदयाचा ठाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - आईने सांगितलेल्या कामाचे तिला बिल देणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या ‘दिनूचे बिल’मधील दिनूचं त्याच्या आईशी असणारं नातं... ‘तुझ को भी मै ग्राईप वॉटर ही पिलाती थी’ असं जाहिरातीतून उलगडणारं आई-लेकीचं नातं... कधी शांताबाई शेळके आणि इंदिरा संतांच्या कवितेतून व्यक्त होणारं, तर कधी मुलांशी त्यांच्याच भाषेत पत्राद्वारे संवाद साधणाऱ्या शोभा डे यांचं मुलांशी असलेलं ‘मॉडर्न’ नातं... अशा स्वरूपात ‘मायलेकरा’चे नाते मखमली शब्द पांघरलेल्या कथा, कविता, गाणी आणि अभिवाचनातून उलगडले, ते ऐकताना अनेकजण आईच्या आठवणीत रमले, गहिवरले आणि दाटलेल्या अश्रूंना मोकळी वाटही करून दिली!

पुणे - आईने सांगितलेल्या कामाचे तिला बिल देणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या ‘दिनूचे बिल’मधील दिनूचं त्याच्या आईशी असणारं नातं... ‘तुझ को भी मै ग्राईप वॉटर ही पिलाती थी’ असं जाहिरातीतून उलगडणारं आई-लेकीचं नातं... कधी शांताबाई शेळके आणि इंदिरा संतांच्या कवितेतून व्यक्त होणारं, तर कधी मुलांशी त्यांच्याच भाषेत पत्राद्वारे संवाद साधणाऱ्या शोभा डे यांचं मुलांशी असलेलं ‘मॉडर्न’ नातं... अशा स्वरूपात ‘मायलेकरा’चे नाते मखमली शब्द पांघरलेल्या कथा, कविता, गाणी आणि अभिवाचनातून उलगडले, ते ऐकताना अनेकजण आईच्या आठवणीत रमले, गहिवरले आणि दाटलेल्या अश्रूंना मोकळी वाटही करून दिली! निमित्त होते, ‘मायलेकरं’ या अनोख्या कार्यक्रमाचे!

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या स्नेह परिवारातर्फे आई आणि मूल यांच्या आंतरसंबंधाचा वेध घेणाऱ्या ‘मायलेकरं’ या उत्कट भावानुभवाच्या कार्यक्रमाचे एस. एम. जोशी सभागृहामध्ये आयोजन केले होते. कवयित्री अरुणा ढेरे, लेखिका वीणा देव, गायिका अनुराधा मराठे, अभिनेता गिरीश ओक व लेखक आशुतोष जावडेकर या साहित्य- कलेच्या प्रांतातील नामवंतांनी एकत्र येत पुणेकरांना काही क्षण आईच्या आठवणींमध्ये नेले.

शब्दांची सुंदर गुंफण करणाऱ्या ढेरे यांच्या ओजस्वी निवेदनाने कार्यक्रमास सुरवात झाली आणि बघता बघता अवघे सभागृह गच्च भरले. कोणी सभागृहाच्या पायऱ्यांवर, तर कोणी थेट व्यासपीठावरच बैठक मांडत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कथा, कवितांमधून भेटणारी आई कधी हळवी; तर कधी तितकीच कणखर होती. जाहिरातींमधील आईच्या मानसशास्त्रापासून ते खुद्द लेखिका असणाऱ्या आईला तिच्या मोठ्या झालेल्या मुलांची वाटणारी काळजी अभिवाचनातून मांडण्यात आली.

कविवर्य गोविंदाग्रजांच्या ‘शिवबाची आई’ या कवितेपासून शांता शेळके, इंदिरा संत ते नीलम माणगावे या कवयित्रीच्या कवितांमधील आई-मुलाचे नाते व्यक्त होते गेले. हेमंत जोगळेकर, फ्रॅंक ऑकनल, गौरी देशपांडे यांच्या कथांतून आई-मुलांचे भावविश्‍व उलगडत गेले, तर ‘नीज माझ्या नंदलाला रे’, ‘बरं का गं आई, हे विसरायचं नाही’, ‘नीज नीज रे शिवराया’ या गाण्यांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. या अनोख्या कार्यक्रमाने उपस्थित शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना मनसोक्‍तपणे हसविले आणि क्षणभर रडविलेही !

Web Title: pune news Speech