गुणपत्रिकांची उत्सुकता अन्‌ विद्यार्थ्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

पुणे - मनात अनामिक धाकधूक... चेहऱ्यावर आनंद... गुणपत्रिका पाहण्याची उत्सुकता... शिक्षकांना पेढे देऊन आशीर्वाद घेणारे विद्यार्थी आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगवित एकमेकांशी संवाद साधत आनंदोत्सवात जल्लोष करणारे विद्यार्थी, हेच दृश्‍य शनिवारी विविध शाळांमध्ये पाहायला मिळाले.

पुणे - मनात अनामिक धाकधूक... चेहऱ्यावर आनंद... गुणपत्रिका पाहण्याची उत्सुकता... शिक्षकांना पेढे देऊन आशीर्वाद घेणारे विद्यार्थी आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगवित एकमेकांशी संवाद साधत आनंदोत्सवात जल्लोष करणारे विद्यार्थी, हेच दृश्‍य शनिवारी विविध शाळांमध्ये पाहायला मिळाले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १३ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. शनिवारी दुपारी तीननंतर शाळास्तरावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. या निमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शहर व उपनगरांतील विविध शाळांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते. शैक्षणिक संस्थांचे विश्‍वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालकही आले होते. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, सीए, तर कोणी परराष्ट्र सेवेत दाखल होण्याची स्वप्ने घेऊन गुणपत्रिका घेण्यासाठी आले होते. 

रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी या वेळी जल्लोष साजरा केला. शाळेचा निकाल ९६.६१ टक्के लागला. शाळेत पहिली आलेली स्वराली जाधव हिने ९६.८० टक्के गुण मिळविले. ती म्हणाली, ‘‘मला कॉमर्समध्ये करिअर करायचे असून सीए व्हायचे आहे.’’  मैत्रियी जोशी हिला ९६टक्के मिळाले. ती म्हणाली, ‘‘माझे मामा इंजिनिअर आहेत. त्यामुळे मी डॉक्‍टर किंवा इंजिनिअरिंग होईल.’’ जान्हवी जोशी हिने ९५ टक्के मिळवले. ती म्हणाली, ‘‘विश्‍वास नांगरे-पाटील यांचे,‘मन में है विश्‍वास’ हे पुस्तक मी वाचले. यातून मला प्रेरणा मिळाली असून मला परराष्ट्र सेवेत जाण्याची इच्छा आहे’’

आपटे प्रशालेत तन्मय बोडके (प्रथम), सर्वेश पटवा (द्वितीय); तर श्रीया गायकवाड, आकांक्षा शिंदे अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकाविला. तन्मयला भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे, तर सर्वेशला संशोधक व्हायचे आहे. आकांक्षाला डॉक्‍टर व्हायची इच्छा आहे. मूकबधिर असलेल्या निकिताला सत्तर टक्के मिळाले. तिचे वडील कुलजित ठाकूर म्हणाले, ‘‘माझ्या मुलीने शिकण्यासाठी खूप कष्ट घेतले. आम्ही तिचा अभ्यास घ्यायचो. गणित विषयात ती हुशार असून, तिला कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे.’’

Web Title: pune news ssc & hsc marksheet distribution