खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आहेत. दिवाळीसाठी सुट्या घेऊन गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. खासगी बसमधून प्रवास आणि जादा भाडे देण्याची वेळ प्रवाशांवर आली. 

दुसरीकडे परगावावरून आलेल्या वाहक, चालकांचेही हाल सुरू झाले आहेत. 

पुणे - सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आहेत. दिवाळीसाठी सुट्या घेऊन गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. खासगी बसमधून प्रवास आणि जादा भाडे देण्याची वेळ प्रवाशांवर आली. 

दुसरीकडे परगावावरून आलेल्या वाहक, चालकांचेही हाल सुरू झाले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये पुण्यासह राज्यातील एसटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, एकही एसटी बस दोन दिवसांमध्ये मार्गावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार एसटीची विभागीय कार्यालये, आरटीओ प्रशासन आणि खासगी वाहतूकदारांच्या बैठका झाल्या. यामध्ये एसटीच्या तिकिटाच्या दरात खासगी वाहतूकदारांनी प्रवासी सेवा पुरवावी, अशी विनंती करण्यात आली, त्यासाठी खासगी वाहतूकदारांनी एसटी स्थानकांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार एसटीच्या स्थानकांमध्ये जाऊन प्रवासी घेण्यास वाहतूकदारांनी सुरवात केली. उद्यापासून (गुरुवार) सलग चार दिवस सुटी सुरू होत आहे. बुधवारी संप मिटेल, या भरवशावर स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली होती. मात्र, सायंकाळपर्यंत संप मिटला नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी बसनेच प्रवास करावा लागला. खासगी बसचालकांकडून जादा दाराने तिकीट घेण्याची अनेकांवर वेळ आली. पंढरपूरसाठी एक हजारांपेक्षा जास्त, तर कोल्हापूरसाठी आठशे ते नऊशे, साताऱ्यासाठी सहाशे रुपये तिकीट आकारल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी म्हणाले, ""खासगी वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त वाहने उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, तिकिटावर नियंत्रण ठेवण्याचे काम आमचे नाही.'' 

बसच्या चाकातील हवा सोडली 
खासगी प्रवासी वाहनांना महामंडळाने स्थानकात येण्यास परवानगी दिली. मात्र, उभ्या असलेल्या एसटी गाड्या हलवता येऊ नयेत, म्हणून चाकांतील हवा कर्मचाऱ्यांनी सोडली, त्यामुळेदेखील अनेक खासगी बसचालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्थानकातच एका बाजूला कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व स्थानकांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवला आहे. 

चालक - वाहक विश्रांतिगृहांना टाळे 
एसटी आगारामध्ये असलेल्या चालक - वाहक विश्रांतिगृहांचा चुकीचा वापर होत असल्याचे करण देत एसटी प्रशासनाने राज्यभरातील सर्व विश्रांतिगृहांना टाळे लावले. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना विश्रांतिगृहातून बाहेर काढण्यात आले. स्वारगेट आगारामध्ये विश्रांतिगृहाला टाळे लावताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने विश्रांतिगृह बंद करण्यात आले, त्यामुळे परगावाहून आलेल्या वाहक- चालकांचे हाल सुरू झाले आहेत. गावी जाण्यासाठी व्यवस्था नाही, अशांनी स्थानकाच्या आवारात बस्तान मांडले आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था कर्मचारी संघटनांनी केली.

Web Title: pune news st bus strike passenger loot