सदनिकांमधील व्यवसायामुळे स्टार्टअपला बूस्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

ऑफिस स्पेसला  सर्वाधिक मागणी 
व्यावसायिक जागांचे भाडेदर वाढल्याचा परिणाम म्हणून अनेक नवउद्योजक हे त्यांच्या घरीच किंवा अल्पदरात भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या निवासी सदनिकांमध्येच आपले कार्यालय सुरू करण्याची तयारी ठेवतील, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ‘ऑफिस स्पेस’ विभागात सुमारे पाच टक्के ‘व्हेकन्सी’ होती, तर हिंजवडी, येरवडा, खराडी, औंध आणि बालेवाडी या भागांमध्ये पहिल्या तिमाहीत ऑफिस स्पेसला सर्वाधिक मागणी असल्याचे कंपनीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

पुणे - शहरातील ‘प्रीमियम’ (मोक्‍याची जागा) व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि ती मिळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे एका खासगी संशोधन संस्थेने ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. त्यामुळे निवासी सदनिकांच  वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचा फायदा व्यावसायिक  आणि लघुउद्योजकांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

‘प्रीमियम ऑफिस स्पेस’ या क्षेत्रातील पुरवठा गेल्या पाच वर्षांत कमी झाल्यामुळे सध्या आणि भविष्यातील उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या व्यावसायिक मालमत्तांची मागणी वाढली असून, आगाऊ नोंदणीचे (प्री-कमिटमेंट) प्रमाणही वाढले आहे. ई-कॉमर्स कंपन्या आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट’ कंपन्यांमुळे प्री-कमिटमेंटचा हा ट्रेंड दिसत आहे. परिणामतः ऑफिससाठीच्या मालमत्तांच्या भाडेदरातही पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

स्टार्टअप्स स्थापन होण्याची संख्या आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीमुळे कार्यालयीन जागेसाठी मागणी वाढती राहील, असा अंदाज आहे. बड्या आयटी कंपन्यांनी स्वतःचे ऑफिस किंवा इमारत बांधण्याऐवजी कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्यास सुरवात केली आहे. हाच ट्रेंड छोट्या कंपन्यांमध्येही येऊ घातला आहे. दुसरीकडे, आयटी कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा प्रक्रिया-केंद्रित काम सुरू झाल्यामुळे मोठ्या व्यावसायिक कार्यालयीन जागांसाठी असलेली मागणी भविष्यात आणखी घटण्याचा धोका आहे. 

पुणे स्टार्टअपसाठी महत्त्वाचे मार्केट 
‘ऑफिस’ या स्टार्टअपचे संस्थापक अमित रमाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात पन्नास लाख ते एक कोटी चौरस फुटांच्या व्यावसायिक जागेची गरज आहे. शहरात अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये, स्टार्टअप्स आणि लघू-मध्यम उद्योगांचे प्रमाण मोठे असल्यामुळे ‘टॅलेंट’ भरपूर आहे. राज्य सरकारने इन्क्‍युबेशन स्पेस निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असल्यामुळे पुणे हे स्टार्टअप क्षेत्राच्या प्रवासातील महत्त्वाचे ठिकाण बनणार आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद आणि कोलकताप्रमाणेच पुणे हे महत्त्वाचे मार्केट आहे.

Web Title: pune news startup business