यंदाचा ऊस गाळप हंगाम आशादायक

मनोज कापडे 
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पुणे - राज्यात यंदा ऊस उपलब्धता चांगली असल्यामुळे आशादायक चित्र आहे. हंगाम उद्यापासून (ता. 1 नोव्हेंबर) सुरू होतोय आणि त्यासाठी यंदा 191 कारखाने धुराडी पेटवणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामातील वाढलेल्या कारखान्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला चांगली चालना मिळेल. 11 लाख हातांना रोजगार मिळेल, असे चित्र आहे. मात्र, देशपातळीवर यंदादेखील महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश साखर उत्पादनात आघाडी घेण्याची चिन्हे आहेत.

बॉयलर पेटण्याआधीच नेहमी ऊस उत्पादक पट्ट्यात आंदोलनाचा बार उडतो. अपेक्षेप्रमाणे खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद घेत 3400 रुपये प्रतिटनाने उसाला पहिली उचल देण्याची मागणी करीत आंदोलने सुरू केलीत. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्रात त्याचा जोर दिसतो आहे. दुसऱ्या बाजूला शेट्टी यांचे विरोधक कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यंदाच्या "एफआरपी'पेक्षाही प्रतिटन 300 रुपये जादा दराची मागणी केली आहे. हंगामाच्या आडून आता शेतकरी संघटनांकडून आपापसातील वाद आणि त्यातून शक्तिप्रदर्शने वाढण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन परवान्यांमुळे फायदा
राज्य सरकारने यंदा दोन सर्वात चांगले धोरणात्मक निर्णय घेतलेत. एकतर गाळप हंगाम ऑक्‍टोबरला सुरू करण्याचा हट्ट सोडून त्याऐवजी एक नोव्हेंबरपासून गाळपाला परवानगी दिली. दुसरी बाब म्हणजे गाळप परवाना पद्धत ऑनलाइन केली. त्यामुळे सरकार दरबारातील हेलपाटे बंद झाले. यंदा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या कारखान्यांची संख्या 191 पर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपात 40 कारखाने जादा उतरत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातील "एफआरपी'ची उलाढालदेखील वाढेल, असे जाणकार सांगतात.

यंदा गाळपासाठी सहकारातून 100, तर खासगी क्षेत्रातील 93 कारखान्यांनी परवानगी मागितली. आयुक्तालयाने 30 ऑक्‍टोबरपर्यंत परवानगी दिलेल्यांमध्ये 42 सहकारी आणि 51 खासगी कारखाने आहेत.

"उत्तम पाऊस आणि उसाची वाढती उपलब्धता यामुळे राज्यात जादा कारखाने गाळपासाठी उतरले आहेत. परवाने झटपट मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धत आणल्यामुळे आम्ही कायदेशीर बाबींचे उल्लंघन होणार नाही याची दखल घेतली. त्यामुळेच शासकीय देणी थकविणाऱ्या 47 आणि शेतकऱ्याची एफआरपी थकविणाऱ्या 13 कारखान्यांना आम्ही परवाने मंजूर केलेले नाहीत, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

जादा ऊस दरासाठी शेतकरी संघटनांकडून मागणी होत असताना साखर कारखानदारांनी मात्र कारखान्यांची आर्थिक स्थिती पाहून योग्य भूमिका घेण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात ऊस नियंत्रण कायदा, मंत्रिसमिती तसेच ऊसदर नियंत्रण मंडळ अस्तित्वात असताना या संस्थांच्या व्यासपीठांवर मुद्दे मांडून त्याचा पाठपुरावा न करता काही नेते उलट आंदोलनाचा वापर करून कारखान्यांच्या गाळप नियोजनात अडथळा आणतात, असा आरोप साखर कारखानदारांचा आहे.

हार्वेस्टरचा वापर वाढणार
राज्यात गेल्या वर्षी केवळ 6.33 लाख हेक्‍टरवर ऊस होता. यंदा तीन लाख हेक्‍टरने लागवड वाढून एकूण पेरा 9.02 लाख हेक्‍टरपर्यंत गेलाय. त्यामुळे यंदा ऊस तोडणीची कामेदेखील वाढतील. ऊस तोडणीमुळे राज्यातील 15 लाख व्यक्तींना रोजगार मिळतो. परराज्यात तोडणीसाठी 3-4 लाख व्यक्ती जातात. यंदा फक्त राज्यात तोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या 11 लाख राहण्याची चिन्हे आहेत, असे तोडणी मजूर संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला राज्यात तोडणी हार्वेस्टरदेखील हजर झाले आहेत. यंदा सर्वाधिक म्हणजेच किमान 290 हार्वेस्टर तोडणीसाठी वापरले जातील, असा अंदाज आहे.

तरुण शेतकरीच हार्वेस्टर व्यवसायात उतरले आहेत. शिवाय राज्यातील सात शेतकरी गट समूहांनीदेखील "केन हार्वेस्टिंग'मध्ये पाय रोवलेत. त्यांनी स्वतःचे हार्वेस्टर खरेदी करून उत्पन्नाचे नवे साधन मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी 100 पेक्षा कमी शेतकऱ्यांकडे स्वतःचे केन हार्वेस्टर होते. आता 204 शेतकऱ्यानी हार्वेस्टर खरेदी केले आहेत. एका हार्वेस्टरसाठी एक कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक लागते. भविष्यात ही गुंतवणूक वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील साखर कारखान्यांना यंदाचा ऊस गाळप हंगाम चांगला जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस उपलब्धता जास्त आहे. मात्र, हंगाम व्यवस्थित चालण्यासाठी गाळप काळात कोणतेही विघ्न कारखान्यांसमोर उभे राहणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी.
- शिवाजीराव नागवडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ

चांगल्या पावसामुळे यंदा राज्यभर अनेक कारखाने चांगल्या क्षमतेने गाळप करतील. आम्हाला भीती फक्त साखर बाजारपेठेतील सरकारी हस्तक्षेपाची वाटते. 3500 रुपये क्विंटलच्या आसपास साखरेचे बाजार राहिल्यास आम्हाला एफआरपी देणे अवघड जाणार नाही.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया शुगर असोसिएशन

यंदाच्या ऊस गाळप हंगामाची वैशिष्ट्ये
उसाचा यंदा एकूण पेरा - 9.02 लाख हेक्‍टर
गाळपासाठी सज्ज असलेले कारखाने - 191
यंदाच्या गाळपाचा प्राथमिक अंदाज- 650 लाख टन
साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज - 73.4 लाख क्विंटल

Web Title: pune news sugarcane galap season