उन्हाळ्यात असे जपा आरोग्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे - पावसाळा, हिवाळा चालेल पण उन्हाळा नको हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठी आला असेल. कारण चाळीस अंशांपार गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण होत आहेत, तसेच या प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी, काय खावे, काय टाळावे, याविषयी शहरातील काही डॉक्‍टरांनी टीप्स दिल्या आहेत. 

डॉ. नेहा शिंदे सांगतात, ‘‘उन्हामुळे भूक लागल्याचे जाणवत नाही. तरीदेखील दैनंदिन नियोजनानुसारच जेवण केले पाहिजे; कारण शरीराला ऊर्जेची गरज असते. तसेच उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आइस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्‍स खाण्याची इच्छा होते. या सवयीमुळे घशावर परिणाम होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे शक्‍यतो टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे. या ऋतूत आंबादेखील सर्वच वयोगटातील लोक आवडीने खातात. मात्र जास्त आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे आंबा खाण्यावरदेखील मर्यादा असावी.’’ 

‘‘उन्हाळ्यात लिंबूपाणी, कैरीचे पन्हे यांसारखी थंडावा देणारी पेये घ्यावीत. ओआरएस पावडर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पाण्यात मिसळून घ्यावी. या गोष्टींच्या सेवनामुळे त्वचा कोरडी पडणे, थकवा येणे, अस्वस्थता वाटणे, गरगरणे असे आजार उद्‌भवत नाही. तसेच उन्हातून आल्यावर फॅन, कुलर, एसीच्या थंड वातावरणात बसू नये आणि थंड पाणीदेखील पिण्याचे टाळावे कारण या गोष्टींचा शरीरावर विपरीत परिणाम होतो,’’ अशी माहिती डॉ. तबस्सूम मुल्ला यांनी दिली.

अशी घ्या काळजी
 भरपूर पाणी प्या
 नैसर्गिकरीत्या थंडावा देणारी फळे खा
 तेलकट आणि मांसाहारी पदार्थ खाणे टाळा
 सकस आहार घ्यावा.

उन्हापासून संरक्षणासाठी हे करा
 सनकोट, टोपी, गॉगल्स, स्कार्फ आवर्जून घाला
 सुती कपड्यांचा वापर करा, शक्‍यतो पांढरे कपडे घालण्यावर भर द्या, फूल बाहीचे आणि अंगभर कपडे घालण्यावर भर द्या 
 सनस्क्रीन लावून बाहेर पडा 

Web Title: pune news summer health care