अंधश्रद्धाळू डॉक्‍टरांना पाठीशी घालणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

अतिदक्षता विभागात रुग्ण असताना मांत्रिकाला बोलावून उपचार करणे चुकीचे आहे. त्यातून डॉक्‍टरच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याचे सिद्ध होते. यामुळे अशा डॉक्‍टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या डॉक्‍टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन कधीही समर्थन करणार नाही.
- डॉ. दिलीप सारडा, कार्यकारी सदस्य, आयएमए

पुणे - शरीरविज्ञानाचा अभ्यास करून वैज्ञानिक पद्धतीने उपचार करणारे डॉक्‍टर, जर रुग्णांवर अवैज्ञानिक पद्धतीने अघोरी उपचार करत असतील, तर ते चुकीचे आहे. दैवावर श्रद्धा असली पाहिजे; पण रुग्णावर उतारा उतरवून त्याच्यावर उपचार करणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या समक्ष मांत्रिकाने केलेले कृत्य हे अवैज्ञानिक व निंदनीय आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या डॉक्‍टरांना पाठीशी घालणार नाही, असे आश्‍वासन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनने दिले.

अंनिसतर्फे ‘रुग्णांवर मांत्रिकाचे अवैज्ञानिक पद्धतीने उपचार : मृत्यूशी गाठ’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला बोलावून रुग्णावर अघोरी पद्धतीने उपचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे कार्यकारी सदस्य डॉ. दिलीप सारडा यांनी मार्गदर्शन केले. मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, अरुण जाधव, दीपक गिरमे, विवेक काशीकर आदी उपस्थित होते. या वेळी प्रश्‍नोत्तर स्वरूपात चर्चा झाली.

Web Title: pune news superstition doctor